अशोक खरातची पत्नी कल्पना खरातला सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण, नेमकं प्रकरण काय?
मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा June 25, 2026 12:43 PM

Kalpana Kharat: दैवीशक्तीचा धाक दाखवून जमीन हडप केल्याच्या प्रकरणात संशयित भोंदू बाबा अशोक खरातची (Ashok Kharat) पत्नी कल्पना खरात (Kalpana Kharat) हिचा अटकपूर्व जामीन (Anticipatory Bail) मंजूर झाला आहे. सिन्नर पोलीस ठाण्यात (Sinnar Police Station) दाखल फसवणूक प्रकरणात नाशिकरोड अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केदार कोपळकर यांनी कल्पना खरातला हा सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने आरोपीला 1 लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि तितक्याच रकमेचा जामीनदार सादर करण्याच्या अटीवर हा जामीन दिला आहे.

Kalpana Kharat: 22 वर्षांनंतर गुन्हा दाखल; न्यायालयाचे महत्वपूर्ण निरीक्षण

सदर कथित जमिनीचा व्यवहार 2004 मधील आहे. तक्रारदार शिवराम माळी यांनी तब्बल 22 वर्षांनंतर, 2026 मध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल (FIR Registered) केला. या प्रदीर्घ कालावधीत फिर्यादी किंवा त्यांच्या भावांनी खरेदीखत रद्द करण्यासाठी किंवा जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी कधीही दिवाणी न्यायालयात दाद मागितली नव्हती, ही बाब न्यायालयाने प्रकर्षाने नोंदवली.

Kalpana Kharat: दिवाणी वादाला गुन्हेगारी प्रकरणाचा रंग देण्याचा प्रयत्न

या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली. करार करताना फसवणुकीचा कोणताही अप्रामाणिक हेतू असल्याचे तपासात समोर आलेले नाही, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले. तसेच, हा व्यवहार नोंदणीकृत दस्तऐवजाद्वारे अधिकृतरीत्या झाला असून, केवळ दिवाणी वादाला गुन्हेगारी प्रकरणाचा रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

Kalpana Kharat: तपासात सहकार्य करण्याचे न्यायालयाचे निर्देश

जरी कल्पना खरातला न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करून मोठा दिलासा दिला असला, तरी काही अटी शर्ती लागू केल्या आहेत. न्यायालयाने आरोपी कल्पना खरातला पोलिसांच्या गुन्ह्याशी संबंधित तपासात (Police Investigation) पूर्ण सहकार्य करण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या निकालामुळे सिन्नर परिसरातील या बहुचर्चित कथित फसवणूक प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.

Ashok Kharat: अशोक खरातविरोधात 7 जुलैला सुनावणी

दरम्यान, सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या भोंदू अशोक खरातविरोधातील दोन गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. दोन्ही प्रकरणांची पुढील सुनावणी 7 जुलै रोजी होणार आहे. अशोक खरात याच्याविरोधात देवीशक्ती असल्याचा दावा करून महिला भाविकांची फसवणूक करणे, त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे, आर्थिक फसवणूक करणे, खंडणी उकळणे तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांत त्याच्याविरोधात एकूण 17 गुन्ह्यांची नोंद असून, त्यापैकी 12 प्रकरणांचा तपास विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) केला जात आहे. महिलांवरील अत्याचाराशी संबंधित आठ गुन्ह्यांमध्ये यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी (दि. 23) आरोपीविरोधातील दोन प्रकरणांची सुनावणी न्यायालयात होणार होती. मात्र, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात न आल्याने सुनावणी पुढे ढकलण्यात आली.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Ketan Agrawal Pune Lohagad Death Case: सियाने क्रिकेटर बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा हट्ट धरला, पण घराणं तोलामोलाचं नसल्याने गोयल कुटुंबाने चेतनला नाकारलं

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.