मुंबई : भारतीय शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी पाहायला मिळाली. कच्चा तेलाच्या दरातील घसरण आणि जागतिक बाजारांमधील तेजीमुळं गुंतवणूकदारांची जोखीम घेण्याचा कल वाढल्यानं सेन्सेक्स 109 अकांच्या तेजीसह तर निफ्टी 50 निर्देशाक 34 अंकांच्या तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स आज 109.25 अंकांच्या तेजीसह म्हणजेच 0.14 टक्क्यांनी वाढून 77,100.47 अंकांवर बंद झाला. सेन्सेक्सवरील टॉप 30 पैकी 19 शेअरमध्ये घसरण झाली तर 11 शेअरमध्ये तेजी दिसून आली. आजच्या ट्रेडिंगमध्ये सेन्सेक्समध्ये 811.96 अंकांची तेजी दिसून आल होती. सेन्सेक्स 77,803.18 अंकांच्या उच्चांकापर्यंत पोहोचला होता.
आयटी कंपन्यांच्या आणि मेटल स्टॉकच्या शेअरची विक्री करत गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्यानं शेअर बाजारातील तेजी कमी झाली. निफ्टी 50 निर्देशांक 34.35 अंकांनी म्हणजेच 0.14 टक्क्यांनी वाढून 24,056 अंकांवर बंद झाला. ट्रेडिंग सुरु असताना निफ्टीनं 24,261.60 अंकांचा उच्चांक गाठला होता तर,24,039 अंकांचा निच्चांक गाठला होता.
सेन्सेक्सवर इंडिगोची मूळ कंपनी इंटरग्लोब एविएशनच्या शेअरमध्ये 4.82 टक्क्यांची तेजी दिसून आली. याशिवाय महिंद्रा अँड महिंद्रा मारुती सुझुकी, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक आणि हिंदुस्तान यूनिलीवरच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. तर, दुसरीकडे पॉवर ग्रीड, भारत इलेक्ट्रॉनिक्स, टेक महिंद्रा, इन्फोसिस आणि भारती एअरटेलच्या स्टॉकमध्ये घसरण झाली.
जिओजीत इन्वेस्टमेंटस लिमिटेडचे संशोधन प्रमुख विनोद नायर यांच्या मते भारत शेअर बाजार अखेरच्या सत्रात स्थिर राहिला, सुरुवातीला असलेली तेजी नफावसुलीमुळं कायम राहू शकली नाही. मात्र, कच्चा तेलाच्या दरातील घसरणीमुळं रुपयाला दिसा मिळाला.मात्र, तेजी कायम ठेवण्यास ते पुरेसं नव्हतं.
नायर पुढे म्हणाले की ऑटो क्षेत्रातील स्टॉकनं चांगली कामगिरी केली. मात्र, दुसरीकडे मेटल स्टॉक्समधील नरमाई, पुरवठा साखळीतील अडचणी कमी झाल्यानं रिटेल मागणी सुधारली आहे. ब्रेंट क्रूड आईलच्या दरात घसरण होऊन ते 72.81 डॉलर प्रति बॅरल वर आले आहेत.
आशियातील इतर बाजारांचा विचार केल्यास दक्षिण कोरियाचा कॉस्पी, जपानचा निक्केई आणि चीनचा शांघाई कम्पोजिट तेजीसह बंद झाले. हाँगकाँगच्या हैंग सेंगमध्ये घसरण झाली. युरोपातील प्रमुख बाजारामध्ये तेजी दिसून आली होती. शेअर बाजारातील आकडेवाीरनुसार विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी 1,843.4 0 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. दरम्यान, मोहर्रम निमित्त उद्या शेअर बाजार बंद असेल.
भारतीय शेअर बाजारात सेन्सेक्स आणि निफ्टी तेजीसह बंद झाले असले तरी गुंतवणूकदारांना 75 हजार कोटी रुपयांचा फटका बसला. 24 जून 2026 ला बीएसईवर लिस्ट असलेल्या कंपन्यांचं बाजारमूल्य 4,75,91,553.93 कोटी रुपये होतं. त्यात आज घसरण झाली आहे. बीएसईवरील कंपन्यांचं बाजारमूल्य 4,75,16,125.05 कोटींवर आले, म्हणजेच गुंतवणूकदारांचे 75,428.88 कोटी रुपये बुडाले.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)