सत्तेत असून सरकारच्या चुका दाखवून देण्यासाठी हिंमत लागते, निलेश राणेंचं कौतुक करावे तेवढं थोडं : रोहित पवार 
एबीपी माझा वेब टीम June 25, 2026 08:13 PM

Rohit Pawar on Nilesh Rane : महाराष्ट्र विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यामध्ये विविध प्रश्नांवरुन सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. तसेच सत्तेतील आमदार देखील महत्वाचे मुद्दे उपस्थित करत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात सभागृहात प्रश्न विचारला. आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने अदा करण्याबाबत त्यांनी भूमिका मांडत प्रश्न उपस्थित केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आमदार निलेश राणे यांचं कौतुक केलं आहे. 

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

वस्तुस्थिती मांडायला तळमळ आणि संवेदना लागते, आमदार नीलेश राणे यांची कोकणातील काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत असताना तीच तळमळ आणि संवेदना दिसून आली. सत्तेत असूनही सरकारच्या चुका दाखवून देणे सोपे नाही, त्यासाठी हिंमत लागते. त्यामुळे आमदार नीलेश राणे यांचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याचे रोहित पवार म्हणाले. आज शेतकरी खऱ्या अर्थाने अडचणीत आहे. त्यामुळं पक्ष बाजूला सारून कोणतीही भीती न बाळगता वस्तुस्थिती सरकारच्या नजरेस आणून देणे तसेच गरज पडल्यास अन्नदात्यासाठी सरकारला धारेवर धरणे सुद्धा आवश्यक असल्याचे रोहित पवार म्हणाले. 
 
आज सभागृहात कृषी विभागासंदर्भात कोकणातील आंबा व काजू बागायतदार शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने अदा करण्याबाबत आमदार निलेश राणे यांनी प्रश्न उपस्थित केला. कोकणच्या बागायतदारांचे आर्थिक नुकसान लक्षात घेता शासनाने त्वरीत कार्यवाही करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी ठाम मागणी राणे यांनी सभागृहात केली आहे. 

कृषी विद्यापीठ पंद करा नाहीतर त्यांचे फंडींग बंद करा, निलेश राणेंची मागणी

अवकाळी पाऊस फेब्रुवारीच्या अखेरीस आला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कृषी अधिकाऱ्यांनी नुकसानीचा अहवाला पाठवला आहे. पंचनाम्यासाठी साडेतीन महिने लागतात का? मंत्री महोदयांना अहवाला सादर झालेला देखील माहित नाही असे निलेश राणे म्हणाले. 2006 ला आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळाली होती. आता 2026 मध्ये नुकसानभरपाई मागत आहोत. आम्हाला किती मदत करणार हे जाहीर करा असे राणे म्हणाले. कृषी विद्यापीठ खोटी माहिती देत आहे. ते बंद तरी करा नाहीतर त्यांचे फंड देणं बंद करा असे राणे म्हणाले.  कोकण कृषी विद्यापीठ नेमकं काय संशोधन कोकणात करते? ते आम्हाला कळायला मार्ग नाही. त्याचा फायदा शेतकऱ्यांनी किती होतो हे कळायला मार्ग नाही असे निलेश राणे म्हणाले. पंडितच्या नावाखाली कृषी विद्यापीठाला पैसे देतो, पण त्याचा फायदा शेतकऱ्यांना किती होतो हे कळायला मार्ग नसल्याचे निलेश राणे म्हणाले. 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.