श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात टीम इंडियाला आयर्लंड दौऱ्यातील पहिल्याच टी 20i मॅचमध्ये उलटफेरचा सामना करावा लागला आहे. आयर्लंडने वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियावर 34 धावांनी मात करत 2 सामन्यांच्या टी 20i मालिकेत विजयी सलामी दिली आहे. आयर्लंडने टीम इंडियासमोर 183 धावांचं आव्हान ठेवलं होतं. टीम इंडियाला विजयी धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरही खेळता आलं नाही. आयर्लंडने टीम इंडियाला 7 बॉलआधी ऑलआऊट केलं. आयर्लंडने टीम इंडियाला 18.5 ओव्हरमध्ये 148 रन्सवर गुंडाळलं. आयर्लंडने अशाप्रकारे टीम इंडिया विरुद्ध टी 20i क्रिकेटच्या इतिहासातील पहिलावहिला विजय मिळवला.
भारताने टॉस जिंकल्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर याने फिल्डिंगचा निर्णय घेतला. भारताने आयर्लंडला झटपट झटके दिले. मात्र त्यानंतर कर्णधार लॉर्कन टकर आणि गॅरेथ डेलानी या दोघांनी कमाल केली. लॉर्कनने अर्धशतक केलं. तर गॅरेथनेही धमाका केला. लॉर्कनने 36 बॉलमध्ये 50 धावा केल्या. तर गॅरेथने 32 चेंडूत 49 धावांचं योगदान दिलं. तसेच इतरांनीही छोटेखानी खेळी करत धावा जोडल्या. त्यामुळे आयर्लंडला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 182 धावांपर्यंत झेप घेता आली. भारतासाठी हर्षित राणा याने तिघांना आऊट केलं. तर अर्शदीप सिंह आणि अक्षर पटेल या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर बर्थडे बॉय शिवम दुबेने 1 विकेट घेतली.
आयर्लंडने विजयी धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम इंडियाला दुसऱ्या ओव्हरपासून झटके द्यायला सुरुवात केली. संजू सॅमसन 5 रन्सवर बोल्ड झाला. जय मुंदरा याने संजूला बोल्ड केलं. इशान किशन 1 रन करुन आऊट झाला. कर्णधार म्हणून श्रेयस अय्यर याने बॅटिंगने निराशा केली. श्रेयसने 3 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
त्यामुळे टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात झाली. मात्र अभिषेक शर्मा याने डॅमेज कंट्रोल केलं. अभिषेकने झंझावाती खेळी करत अर्धशतक ठोकलं. मात्र अभिषेक अर्धशतकानंतर आऊट झाला. अभिषेकने 20 बॉलमध्ये 50 रन्स केल्या. त्यानंतरही भारताकडे खूप फलंदाज होते. त्यामुळे चाहत्यांना भारत जिंकेल हा विश्वास होता. मात्र अभिषेकनंतर एकालाही भारतासाठी मोठी खेळी करुन विजयापर्यंत पोहचवता आलं नाही.
वॉशिंग्टन सुंदर याने 9 धावा केल्या. उपकर्णधार तिलक वर्मा याने 19 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. शिवम दुबे आणि अक्षर पटेल या दोघांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र दोघेही निर्णायक क्षणी बाद झाले. अक्षरने 15 आणि शिवमने 25 धावा केल्या. हर्षित राणा याने 8 धावा केल्या. तर अर्शदीप सिंह आऊट होताच टीम इंडिया ऑलआऊट झाली. आयर्लंडने अशाप्रकारे विजय मिळवला.
आयर्लंडसाठी मॅथ्यू हम्फ्रीज आणि मॅथ्यू हॉलार्ड या दोघांनी प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळवल्या. जय मुंदरा याने दोघांना आऊट केलं. तसेच दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेत इतरांना चांगली साथ दिली.