पुणे - अपुरा पाऊस आणि तळाला गेलेले पाणीस्रोत यामुळे राज्यातील ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत आहे. परिणामी राज्यात सध्या सुमारे बाराशे टँकरद्वारे सुमारे २२ लाखांहून अधिक नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे.
सध्या छत्रपती संभाजीनगर विभागात सर्वाधिक ४१५ टँकर कार्यरत असून, पुणे विभागात २९२, नाशिकमध्ये १८५, कोकणात १७७, अमरावतीत ९५ आणि नागपूर विभागात ३४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
पावसाची स्थिती आणि स्थानिक मागणीनुसार टँकरच्या संख्येत बदल होत असून, मॉन्सून पूर्णपणे सक्रिय होईपर्यंत अनेक भागांत टँकरद्वारेच पाणीपुरवठा सुरू राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन महसूल विभागाने पाणीपुरवठा यंत्रणेशी समन्वय साधत मार्च महिन्यापासून टंचाई असलेल्या गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून ग्रामीण भागातील नागरिकांसह जनावरांसाठीही टँकरच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले जात आहे.