Pune News : पुणे स्थानकावर ९ तासांचा ब्लॉक; पाच जुलैला डेक्कन एक्स्प्रेससह अनेक गाड्या रद्द
esakal June 28, 2026 03:45 AM

पुणे - पुणे स्थानकाच्या यार्डातील डबल डायमंड क्रॉसिंग (डीडीएस) पॉइंट क्रमांक २०७ आणि २०८ काढून त्याजागी नवीन पॉइंट बसविण्यात येणार आहे. तसेच सध्याच्या ५२ किलो रुळाच्या जागी ६० किलो वजनाचे रुळ टाकण्यात येणार आहेत.

यामुळे क्रॉसिंगवरील प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. हे काम ६ जुलैला होणार असून यासाठी ९ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान काही रेल्वे गाड्या रद्द व काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत.

पुणे रेल्वे प्रशासन सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत तब्बल नऊ तासांचा ब्लॉक घेणार आहे. यामुळे रविवारी रेल्वे वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून, डेक्कन एक्स्प्रेस, दौंड डेमूसह काही उपनगरीय लोकल पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. काही गाड्या हडपसर, शिवाजीनगर आणि खडकी स्थानकांवरूनच चालवल्या जातील.

उपनगरीय आणि इतर गाड्यांच्या मार्गातील बदल

- शिवाजीनगर : लोणावळा-पुणे (९९८०५, ९९८०७, ९९८१३) आणि तळेगाव-पुणे (९९९०५, ९९९०७) या लोकल शिवाजीनगर स्थानकावर थांबतील. परतीच्या प्रवासात पुणे-तळेगाव (९९९०४) आणि पुणे-लोणावळा (९९८१२, ९९८१४, ९९८२०, ९९८२४) या लोकल शिवाजीनगर स्थानकावरूनच सुटतील.

- खडकी : जयपूर-पुणे (१२९४०) आणि सीएसएमटी-पुणे एक्स्प्रेस (१२१२७) खडकी स्टेशनवर थांबतील, तर पुणे-जयपूर (१२९३९) सायंकाळी ५ वाजून ३५ मिनिटांनी आणि पुणे-सीएसएमटी एक्स्प्रेस (१२१२८) सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल.

या गाड्या रद्द

  • गाडी क्र. ११००७ : सीएसएमटी मुंबई-पुणे एक्स्प्रेस

  • गाडी क्र. ११००८ : पुणे-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस

  • गाडी क्र. ९९९०२ : पुणे-तळेगाव उपनगरीय लोकल

  • गाडी क्र. ९९९०३ : तळेगाव-पुणे उपनगरीय लोकल

  • गाडी क्र. ७१४०७ : पुणे-दौंड डेमू

  • गाडी क्र. ७१४२० : सातारा-पुणे डेमू

या गाड्या हडपसरपर्यंतच

नागपूर-पुणे एक्स्प्रेस (१२१३६), अमरावती-पुणे एक्स्प्रेस (११४०६) आणि जम्मू तवी-पुणे एक्स्प्रेस (११०७८) या गाड्या पुणेऐवजी हडपसर स्थानकावरच थांबतील. परतीच्या प्रवासात पुणे-नागपूर एक्स्प्रेस (१२१३५) हडपसर स्थानकावरून सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.