Pune University Gandhi Smarak: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महात्मा गांधी स्मारक समिती स्थापन
esakal June 28, 2026 03:45 AM

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे स्मारक उभारण्याच्या उद्देशाने शनिवारी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच माध्यम क्षेत्रातील मान्यवरांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सर्वानुमते "राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ" या समितीची स्थापना करण्यात आली.

बैठकीत महात्मा गांधी स्मारक उभारण्याची आवश्यकता, त्यामागील सामाजिक भूमिका आणि भावी कार्ययोजना यावर सविस्तर चर्चा झाली. महात्मा गांधी यांनी सत्य, अहिंसा, सामाजिक सलोखा, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचा दिलेला संदेश आजही तितकाच महत्त्वाचा असून, त्यांच्या विचारांचा वारसा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठ परिसरात प्रेरणादायी स्मारक उभारणे ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

स्मारकाची उभारणी ही केवळ एका वास्तूची निर्मिती नसून सामाजिक ऐक्य, शांतता, लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे संवर्धन व प्रसार करणारा व्यापक सामाजिक उपक्रम ठरेल, असेही बैठकीत नमूद करण्यात आले. हा विषय केवळ विद्यापीठ प्रशासनापुरता मर्यादित नसून समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन पुढे नेण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

बैठकीत समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. त्यानुसार मा. उल्हासदादा पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. प्रशांत जगताप आणि नितीन पवार यांची कार्यकारी अध्यक्ष, प्रा. हर्ष जगझाप यांची सचिव, तर सिद्धांत जांभुळकर यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली. तसेच स्मारक उभारणीसंदर्भातील तांत्रिक बाबींचा अभ्यास आणि नियोजन करण्यासाठी स्वतंत्र तांत्रिक समिती स्थापन करण्यात आली असून, तिच्या प्रमुखपदी गोपाल तिवारी यांची निवड करण्यात आली.

या बैठकीस मा. उल्हासदादा पवार, अरुण खोरे, महावीर जोंधळे, लक्ष्मीकांत देशमुख, विकास देशपांडे, इंदुमती जोंधळे, अन्वर राजन, दीप्तीताई चौधरी, प्रशांत जगताप, गोपाल तिवारी, शरद जावडेकर, नितीन पवार, प्रा. हर्ष जगझाप, डॉ. प्रदीप आवटे, गोविंद भंगुरे, गोपालकृष्ण गुणाले, प्रा. ऋषिकेश येवलेकर, सूरज कुलकर्णी, रघुनाथ चव्हाण, समाधान फुगे, अक्षय कांबळे, ऋत्विक धनवटे, सिद्धांत जांभुळकर, साहेबराव शिरसाट यांच्यासह विद्यापीठातील अनेक विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी महात्मा गांधी यांच्या विचारांचा वैचारिक वारसा जतन करण्यासाठी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्रेरणादायी स्मारक उभारण्यासाठी सामूहिकपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. "महात्मा गांधींचे सत्य, अहिंसा आणि सामाजिक सलोख्याचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हे स्मारक प्रभावी माध्यम ठरेल. गांधींच्या विचारांचा वारसा समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे," असेही यावेळी नमूद करण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.