कऱ्हाड - शैक्षणिक गुणवत्ता, इंग्रजीचा अभाव, भौतिक सुविधा नसल्यामुळे जिल्हा परिषद शाळांचा पट घसरत आहे. त्यावर पर्याय म्हणून झेडपीच्या शाळांतही इंग्रजीचे शिक्षण मिळून घटती पटसंख्या रोखण्यासाठी पंचायत समितीकडून तालुक्यातील २०० शाळांत सेमी इंग्रजीचे शिक्षण सुरू करण्यात आले आहे. खासगी शाळांच्या तुलनेत झेडपीच्या शाळा टिकाव्यात, यासाठी पंचायत समितीने टाकलले हे पाऊल अन्य तालुक्यांसाठी दिशादर्शकच ठरले आहे.
इंग्रजी शिक्षणाच्या आकर्षणाने अनेक पालक खासगी शाळांकडे वळत आहेत. परिणामी अनेक गावांतील जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर परिणाम झाला आहे. मात्र, गुणवत्तापूर्ण शिक्षण, सक्षम शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची परंपरा असलेल्या झेडपी शाळांना नवसंजीवनी देण्यासाठी येथील पंचायत समितीने पुढाकार घेऊन सेमी इंग्रजी शिक्षणाचा निर्णय घेतला आहे.
सभापती नंदाताई यादव, उपसभापती अनिता वेताळ, गटविकास अधिकारी प्रताप पाटील, गटशिक्षणाधिकारी बिपिन मोरे व पंचायत समिती सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. त्याद्वारे विद्यार्थ्यांना मातृभाषेच्या भक्कम पायावर इंग्रजी विषयाची अधिक चांगली ओळख होणार आहे.
पंचायत समितीच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांना आवश्यक प्रशिक्षण, शैक्षणिक साहित्य आणि अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.
पालकांचा विश्वास वाढण्याची संधी
इंग्रजी शिक्षणाच्या अपेक्षेमुळे अनेक पालक खासगी शाळांकडे वळले. परिणामी जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या घटली. अशा परिस्थितीत सेमी इंग्रजीचा उपक्रम झेडपी शाळांसाठी नवा बळ देणारा ठरणार आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षक, मोफत पाठ्यपुस्तके, विविध शासकीय योजना आणि आता इंग्रजी शिक्षणाची जोड यामुळे ग्रामीण भागातील पालकांचा विश्वास पुन्हा मिळविण्याची संधी शाळांना निर्माण झाली आहे.
अभ्यासक्रमही सीबीएसईच्या धर्तीवर
शासकीय शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सीबीएसई पॅटर्नच्या धर्तीवर आधारित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात आली आहे. त्याला सेमी इंग्रजीची जोड मिळाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण आणि स्पर्धात्मक शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे.
असे आहेत उपक्रमाचे फायदे
विज्ञान, गणितासह विषयांच्या स्पष्ट होणार संकल्पना
इंग्रजी शब्दांची शब्दसंपदा वाढणार
ग्रामीण विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यावर भर
स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणासाठी फायदा
झेडपी शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत
ग्रामीण शिक्षणाला नवी दिशा मिळण्याची संधी
कऱ्हाड तालुक्यातील अनेक पालक मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळेत घालत असल्याने झेडपी शाळांचा पट कमी होत आहे. पंचायत समिती शिक्षण विभागाद्वारे झेडपीच्या तालुक्यातील २०० शाळांत सेमी इंग्रजी सुरू केली आहे. पुढील वर्षी सर्व शाळांत सेमी इंग्रजी सुरू करण्याचा मानस आहे.
- बिपिन मोरे, गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, कऱ्हाड.