भारतावर मालिका पराभवाची टांगती तलवार, तरीही वैभवला संधी नाही, मग घेतलंच कशाला? चाहत्यांचा संतप्त सवाल
GH News June 28, 2026 09:12 PM

भारत आणि आयर्लंड यांच्यात दोन सामन्यांची टी20 मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडने विजय मिळवल्याने 1-0 ने आघाडी आहे. त्यामुळे भारतासाठी दुसरा सामना करो या मरोची लढाई आहे. भारताला हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडवायचा आहे. पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा वगळता सर्व फलंदाज फेल गेले होते. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात भारतीय संघात वैभव सूर्यवंशीला संधी मिळेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. नाणेफेकीचा कौल झाला आणि कर्णधार श्रेयस अय्यरने प्लेइंग 11 ची घोषणा केली. मात्र या संघात वैभव सूर्यवंशीचं नाव नव्हतं. उलट या प्लेइंग 11 मध्ये दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी मिळाली. अष्टपैलू सूर्यांश शेडगे आणि वेगवान गोलंदाज प्रिंस यादव यांचं पदार्पण झालं. पण वैभव सूर्यवंशीला डावलल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला.  महत्त्वाच्या सामन्यात त्याला डावलल्याने चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. प्लेइंग 11 मध्ये घ्यायचं नव्हतं तर निवडलंच कशाला? असा प्रश्नही चाहत्यांनी सोशल मीडियावर विचारला आहे.

काय म्हणाला कर्णधार श्रेयस अय्यर?

श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही दोन बदल केले आहेत. सूर्यांश शेडगे आणि प्रिन्स यादव संघात आले आहेत. दोघेही पदार्पण करत आहेत . त्यामुळे हे दोन बदल आम्ही केले आहेत. शेडगे एक शक्तिशाली, विध्वंसक फलंदाज आहे. एक सनसनाटी युवा खेळाडू आहे, जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणि आयपीएलमध्येही धावा करत आहे. त्याला युवा क्रिकेटचा प्रचंड अनुभव आहे. त्यामुळे त्याने ‘अ’ संघाच्या दौऱ्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला त्याचा फायदा मिळत आहे. प्रिंस यादवचा पहिलाच सामना आहे, त्यामुळे मला त्याच्यावर जास्त दबाव टाकायचा नाही. त्याने इथे येऊन अनुभव घेणे आणि जे काही उपलब्ध आहे त्यातून अनुभव मिळवणे महत्त्वाचे आहे. आणि आम्ही मागच्या सामन्यात कसे खेळलो हे त्याने पाहिले असेलच. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तो नक्कीच पुरेसा हुशार आहे.’

वैभव सूर्यवंशीला आणखी वाट पाहावी लागणार

बेलफास्टमध्ये वैभव सूर्यवंशीचं पदार्पण होईल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. त्यामुळे दुसरा सामनाही त्याला डगआऊटमध्ये बसून पाहाणार आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैभव सूर्यवंशीला पदार्पण करण्यासाठी आणखी काळ वाट पाहावी लागणार आहे. आयर्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा 1 जुलैपासून सुरू होणार आहे. या दौऱ्यात वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी मिळू शकते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.