Vivekachi Wari News: सिंदखेडराजाहून पंढरपूरकडे 'विवेकाची वारी' : संतपरंपरा, समता आणि मानवतेचा जागर करणारा वैचारिक प्रवास
esakal June 29, 2026 03:45 AM

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) : मध्ययुगापेक्षाही गुंतागुंतीच्या आणि विवेक हरवत चाललेल्या आजच्या काळात संत-समाजसुधारकांचा ज्ञानमार्ग धूसर होतोय, परंपरांचे अपहरण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर साहित्यिक, कलावंत, विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत 'विवेकाची वारी' सुरू केली आहे. मातृतीर्थ सिंदखेडराजा येथून लोकतीर्थ पंढरपूरपर्यंत निघालेल्या या वैचारिक वारीतून 'भेदाभेद भ्रम अमंगळ'चा जागर करत समता, मानवता आणि विवेकाचा संदेश दिला जाणार आहे. १० ते १८ जुलै दरम्यान ही वारी निघणार आहे. आषाढी वारीच्या गर्दीत भक्ती आणि विवेकाचा संगम घडवणाऱ्या या 'विवेकाच्या वारी'त महाराष्ट्रातील प्रत्येक लेखक-विचारवंताने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

आषाढ महिन्यात पंढरीची वाट चालणारी पावलं ही केवळ श्रद्धेची यात्रा नसते, तर ती महाराष्ट्राच्या मनाची धडधड असते. शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघतात. ही वारी कर्मकांडात अडकलेली नसून डोळस श्रद्धेची आहे. इथे जात-पात, उच्च-नीच, स्त्री-पुरुष हा भेद गळून पडतो. चंद्रभागेच्या वाळवंटात अवघा समाज एक होऊन 'ज्ञानदीप' लावतो. पंढरपूर म्हणजे भूवैकुंठ. विटेवर उभा असलेला सावळा विठोबा आणि माय रुखमाई हे केवळ दैवत नाही, तर ते शोषितांचे, कष्टकऱ्यांचे, मुक्या समाजाचे ऊर्जाकेंद्र आहे. त्याच्या दारी 'बुडती हे जन, न देखवे डोळा' हा कळवळा घेऊन संतांनी समतेचा, मानवतेचा, विवेकाचा झेंडा रोवला.

या संतपरंपरेने महाराष्ट्राला उभे राहण्याचे बळ दिले. 'कांदा मुळा भाजी'त देव पाहणारा शेतकरी असो वा विद्रोहाचे प्रतीक असलेली जनाई, या सगळ्यांनी 'भेदाभेद भ्रम अमंगळ' हा विचार पेरला. 'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी' हा संदेश घेऊन अवघा देश वारीमय केला. खरा धर्म जगाला प्रेम अर्पावे हाच आहे असे त्यांनी सांगितले. विषमता, धर्मांधता आणि सांस्कृतिक शोषणाला इथे थारा नाही.

आज अक्षरओळख वाढली, सुविधा वाढल्या, पण विवेक हरवत चालला आहे. संतांचा, समाजसुधारकांचा ज्ञानाकडे नेणारा मार्ग कुठेतरी धूसर होतो आहे. परंपरांचे अपहरण होत आहे, संतांच्या उपदेशाला भ्रष्ट केले जात आहे. अशा काळात शब्दांची शस्त्रे करणारे साहित्यिक, कलावंत, शिक्षक, अभ्यासक, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते 'विवेकाच्या वारी'च्या निमित्ताने एकत्र आले आहेत. ही 'विवेकाची वारी' जालना, अंबड, गेवराई, बीड, मांजरसुंबा, चौसाळा, कुंथलगिरी, भूम, परांडा, कुर्डुवाडी अशा मार्गाने जाताना विविध संत, महंत, समाजसुधारक आणि महापुरुषांच्या स्मृतीस्थळांना अभिवादन करत पंढरपूरकडे पुढे सरकणार आहे. वारीदरम्यान मार्गातील गावांमध्ये संवाद, प्रबोधनपर कार्यक्रम, संतवाङ्मय चिंतन, सामाजिक समतेवरील चर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

'विवेकाच्या वारी'चा मुख्य उद्देश भक्ती आणि विवेक यांचा संगम घडवून समाजात सकारात्मक परिवर्तनाचा संदेश पोहोचवणे हा आहे. 'स्वातंत्र्याकडून अधिकच्या स्वातंत्र्याकडे' जाण्याचा निर्धार या वारीतून व्यक्त होत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्वज्ञ आणि मान्यवर या वारीत सहभागी झाले असून, चंद्रभागेच्या वाळवंटात संतांनी भक्तीचा सोहळा केला तसाच विचारांचा सोहळा आज महाराष्ट्रभर मांडला जात आहे. 'विवेकाची वारी' निरंतर आहे, कारण समतेचा, मानवतेचा आणि विवेकाचा प्रवाह कधीच आटत नाही, तोच या भूमीचा खरा सांस्कृतिक चेहरा आहे.

"संतांचा मूळ प्रबोधनाचा आशय हरवत आहे, त्यांच्या उपदेशाला भ्रष्ट केलं जात आहे. अशावेळी कलावंत आणि नागरिकांनी गप्प राहू नये. तुकोबांनीच शब्दांना शस्त्र करायला शिकवलं, खरा वैष्णव कोण हे सांगितलं. गर्दीत आपला आवाज क्षीण वाटला तरी 'बोलावे ते आम्ही' या तुकोबांच्या भूमिकेतून बोललंच पाहिजे. वारी-दिंडी म्हणजे निखळ मानव्यभाव; तोच जोपासायचा आहे. संतांची शिकवण धर्मांध, जातीयवादी प्रवृत्तींनी प्रदूषित करू नये म्हणून मृदंग-टाळाच्या गजरात आपण समतेचं गाणं गायलं पाहिजे."

–श्रीकांत देशमुख, नांदेड, ज्येष्ठ साहित्यिक

"शोषणाला, बुद्धिभेदाला न समजणे किंवा मूक संमती देणे हाच फॅसिझमला दिलेला पाठिंबा आहे. म्हणूनच 'विवेकाची वारी' समतेकडून समतेकडेच निघाली आहे. काळ कुट्ट आहे, पण आपण स्वतंत्र बुद्धीचे, विवेकाने विचार करणारे आहोत. आपण परंपरांकडे डोळसपणे पाहायचं विसरलो आणि 'टाळकुट्या संताळ्यांनी देश बुडविला' या टीकेला दुजोरा देतोय की काय, अशी स्थिती आहे. यासाठीच समतेकडून समतेकडेच जाण्यासाठी म्हणून 'विवेकाची वारी' महत्त्वाची आहे."

-श्रीकांत ढेरंगे, कवी

नियोजन असे

वारी विवेकाची : मातृतिर्थ सिंदखेडराजा ते लोकतिर्थ श्रीक्षेत्र पंढरपूर

शुक्रवार १० जुलै ते शनिवार १८ जुलै २०२६

वारकरी विचार, विवेक, संस्कार आणि सामाजिक जागृतीचा प्रवास.

दिवस १ : शुक्रवार, १० जुलै २०२६

  • प्रस्थान सोहळा – सिंदखेडराजा

  • सकाळी ८.०० वा.

  • राजमाता जिजाऊ मॉसाहेब यांना सजग स्त्रीशक्तीद्वारे अभिवादन

  • मार्गदर्शक : कृषीभूषण विजुअण्णा बोराडे

  • अध्यक्ष : मा. श्रीकांतजी देशमुख

  • प्रमुख उपस्थिती : उल्हास पाटील, गाथा परिवार

  • दुपार : कडवंची

  • मुक्काम : खरपुडी (जालना)

  • विषय : मुलांच्या उपस्थिती संदर्भात लेखक-वक्ते संवाद

  • वक्ते : निरंजन टकले

दिवस २ : शनिवार, ११ जुलै २०२६

  • जालना

  • शहरातून संत-महापुरुषांच्या स्मृतीस्थळांना अभिवादन करत नगर प्रदक्षिणा

  • यशवंतनगर विठ्ठल मंदिर

  • दुपार : गोलापांगरी

  • शेवगाव – मठपिंपळगाव

  • मुक्काम : अंबड

  • कीर्तन : ह भ प डॉ. उज्ज्वलकुमार महाराज चव्हाण, मुंबई

दिवस ३ : रविवार, १२ जुलै २०२६

  • अंबड

  • अंबड शहर दिंडी

  • वडीगुद्री (शहागड)

  • मुक्काम : समर्थ कारखाना

दिवस ४ : सोमवार, १३ जुलै २०२६

  • गेवराई

  • पाडळशिंगी

  • बीड

  • कीर्तन : ह भ प श्रीकृष्ण महाराज उबाळे, बीड

दिवस ५ : मंगळवार, १४ जुलै २०२६

  • बीड ते चौसाळा

  • बीड शहर दिंडी

  • कपीलधार – मांजरसुंबा

  • मुक्काम : चौसाळा

दिवस ६ : बुधवार, १५ जुलै २०२६

  • चौसाळा ते भूम

  • चौसाळा शहर दिंडी

  • कुंथलगिरी

  • कवीसंमेलन

  • मुक्काम : भूम

दिवस ७ : गुरुवार, १६ जुलै २०२६

  • भूम ते परांडा

  • भूम प्रदक्षिणा

  • दुपार : अनाळा

  • मुक्काम : परांडा

दिवस ८ : शुक्रवार, १७ जुलै २०२६

  • परांडा ते कुर्डुवाडी

  • परांडा शहर दिंडी

  • दुपार : कुर्डुवाडी

  • मुक्काम : लऊळ मार्गे अरण

दिवस ९ : शनिवार, १८ जुलै २०२६

  • अरण ते श्रीक्षेत्र पंढरपूर

  • सांगता सोहळा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.