Alandi Palakhi Dispute Ends: माऊलींच्या रथाच्या बैलजोडी मानावरील वादाचा शेवट; आळंदी देवस्थानकडून रानवडे कुटुंबीयांमध्ये मानाचे विभाजन
esakal June 29, 2026 03:45 AM

आळंदी : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात चांदीच्या रथाला बैलजोडी जुंपण्याच्या मानापमान नाट्याच्या वादावर अखेर पडदा पडला आहे. आळंदी देवस्थानने बैलजोडीचा मान रानवडे कुटुंबातील हर्षवर्धन रानवडे, उमेश रानवडे, तुळशीराम रानवडे या तिघांना विभागून दिला आहे.

याबाबतचे पत्र आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे आणि पालखी सोहळा प्रमुख ॲड. राजेंद्र उमाप यांनी रानवडे कुटुंबीयांना आज दिले.

आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त डॉ. देखणे आणि सोहळा प्रमुख ॲड. उमाप यांनी सांगितले की, बैलजोडीचा वाद निवड समितीच्या एकोप्याने मिटला असून यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्यात रथाला बैलजोडी जुंपण्याचा मान रानवडे कुटुंबीयांना देण्यात आला आहे.

बैलजोडी निवड समितीची बैठक आज पार पडली. यावेळी बैलजोडी निवड समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, उपाध्यक्ष शिवाजीराव रानवडे, नंदकुमार कुऱ्हाडे, रामचंद्र भोसले, रमेश कुऱ्हाडे, विलास घुंडरे यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर ठरावाची प्रत आळंदी देवस्थानला दिली आणि आळंदी देवस्थानने समितीने दिलेल्या ठरावाला मंजुरी देत रानवडे कुटुंबीयांना बैलजोडी लावण्याबाबतचे पत्र दिले. यावेळी आळंदी देवस्थानचे विश्वस्त चैतन्य महाराज कबीर आणि पुरुषोत्तम महाराज पाटीलही उपस्थित होते. या पत्रामध्ये बैलजोडी निवड समितीच्या शिफारशीनुसार हर्षवर्धन रानवडे यांना पुणे जिल्हा, उमेश रानवडे यांना सातारा जिल्हा तर तुळशीराम रानवडे यांना सोलापूर जिल्ह्यात जाताना आणि परतीच्या मार्गावर बैल रथाला जुंपण्याचा मान दिला आहे. याचबरोबर रथावर बैलजोडी धारक दोन व्यक्ती व त्यांना सहाय्य करणाऱ्या दोन अशा चार व्यक्तींपैकी दोनच जण बसतील. आळंदी देवस्थानकडून या चार जणांना ओळखपत्र दिले जाईल. बैलजोडीबाबत मान दिलेल्या व्यक्तींनी याबाबतचे हमीपत्र आळंदी देवस्थानला सादर करावयाचे आहे. आज झालेल्या आळंदी देवस्थान आणि बैलजोडी निवड समितीच्या बैठकीमुळे रथाला बैल जुंपण्याचा मानाचा वाद मिटला आहे.

बैलजोडी मानाचा घटनाक्रम :

1) हर्षवर्धन रानवडे आणि तुळशीराम रानवडे या दोन कुटुंबांना बैलजोडी जुंपण्याचा मानाबाबत 9 जून रोजी पत्र दिले.

2) उमेश रानवडे यांनी गुरुवारी (ता. 11 जून) माऊली मंदिरासमोर बैलजोडीसह बेमुदत उपोषण केले होते.

3) बैलजोडी निवड समिती आणि आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांनी 48 तासांत याबाबत तोडगा काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर रानवडे यांनी उपोषण 11 जूनला मागे घेतले.

4) बैलजोडी निवड समितीचे अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे यांनी 16 जून रोजी आळंदी देवस्थानला दिलेल्या पत्रानुसार, 1982 सालापासून माऊलींच्या रथास बैलजोडी लावण्याची हमी व जबाबदारी बैलजोडी निवड समितीने घेतली असल्याचा उल्लेख.

5) उमेश रानवडे यांनी बुधवारी (ता. 17) बैलजोडी निवड समितीच्या विरोधात न्यायालयात जाण्याबाबत पत्र आळंदी देवस्थानला दिले.

6) उमेश रानवडे यांनी आळंदी देवस्थानला वकिलामार्फत 26 जून रोजी कायदेशीर नोटीस पाठवली.

7) 28 जून रोजी बैलजोडी निवड समितीची बैठक आणि ठराव मंजूर. या ठरावाला मंजुरी देत आळंदी देवस्थानकडून बैलजोडी निवडीबाबतचे पत्र रानवडे कुटुंबीयांना देण्यात आले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.