Pune Property Tax : पुणे महापालिकेची विक्रमी मिळकतकर वसुली: पहिल्या तिमाहीत १३९५ कोटी, गेल्या वर्षीपेक्षा १०२ कोटींची वाढ
esakal July 04, 2026 11:45 PM

पुणे : आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत पुणे महापालिकेच्या मिळकतकरातून विक्रमी १,३९५.८६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यंदा ७ लाख ४० हजार २८२ मालमत्ताधारकांनी कर भरला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत ६ लाख ८६ हजार ७१२ मालमत्तांकडून १,२९२.९४ कोटी रुपयांचे संकलन झाले होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत १०२.९२ कोटी रुपयांनी उत्पन्न जास्त आहे.

शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी, वाहतूक आणि इतर विकासकामांसाठी मिळकत कर हा महापालिकेच्या महसुलाचा प्रमुख स्रोत मानला जातो. शहरात विविध विकासकामे सुरू असून त्यासाठी आवश्यक निधी उभारण्यासाठी मिळकत कर विभागावर प्रमुख जबाबदारी असते. महापालिकेतर्फे दरवर्षी १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत मिळकतकरावर ५ ते १० टक्के सवलत दिली जाते. त्यामुळे या दोन महिन्यात बहुतांश नागरिक कर भरतात. यंदा या दोन महिन्यात १२००.४७ कोटी रुपये रक्कम जमा झाली आहे. त्यानंतर पुढील एका महिन्यात जवळपास दोनशे कोटी रुपये जमा झाले आहेत.

६ लाख १५ हजार ३५२ निवासी मालमत्तांकडून ६८८.२० कोटी रुपये, तर बिगर निवासी ८७,५९६ मालमत्तांमधून ५६७.०२ कोटी रुपये जमा झाले. मोकळ्या जागांमधून ४५.३८ कोटी आणि मिश्र वापराच्या मालमत्तांकडून ९५.२७ कोटी रुपये मिळाले आहेत. कर भरणा करण्यामध्ये पुणेकरांकडून ऑनलाइन व्यवहारांना प्राधान्य दिले जात आहे. ५ लाख ४१ हजार ५०० मालमत्ताधारकांनी ऑनलाइन पद्धतीने ९२७.०२ कोटी रुपये भरले. तर रोख व्यवहारातून ११४.३८ कोटी आणि धनादेश/डीडीद्वारे ३५४.४६ कोटी रुपये जमा झाले आहेत, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी दिली.

आर्थिक वर्ष -कर भरणाऱ्या मालमत्तांची संख्या -कर संकलन (कोटी रुपये)

  • २०२२-२३ -६,३९,७४१ -१,०७८.९७

  • २०२३-२४ -३,५१,२७५ -५३५.३२

  • २०२४-२५ -७,१४,४२५ -१,३८८.७९

  • २०२५-२६ -६,८६,७१२ -१,२९२.९४

  • २०२६-२७ -७,४०,२८२ -१,३९५.८६

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.