पुणे : "राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कॉंग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रश्नच नाही, त्याविषयी कोणत्याही प्रकारची चर्चा नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फुटीनंतर अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्या चर्चा केवळ विरोधी पक्षांना अस्थिर करण्यासाठी व विरोधी पक्षातील एकसंधता तोडण्यासाठी मुद्दाम पसरविल्या जात आहेत.' असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शनिवारी केला.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे, पिंपरी-चिंचवड शहर व जिल्ह्याच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, शहराध्यक्ष श्रीकांत पाटील उपस्थित होते. "राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये सत्तेत जाण्याची मागणी करणारा व व पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याचा आग्रह धरणारा, असे दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत का ? ' या प्रश्नावर उत्तर देताना शिंदे म्हणाले, "अधिवेशनपासून अशा चर्चा पेरल्या जात आहेत. मुळात अशी कुठलीही चर्चा झालेली नाही. पक्षाचे नेते शरद पवार यांच्या विचारातून हा पक्ष वाटचाल करत आहे. सध्याच्या राजकीय घटना घडत आहेत, त्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करणार आहोत. त्यामुळे आमचा पक्ष कॉंग्रेस पक्षामध्ये विलीनीकरणाचा प्रश्नच नाही. याऊलट आम्ही पक्षाच्या संघटनात्मक बांधणीस प्राधान्य देण्यासह राज्य व जिल्हा कार्यकारिणीमध्ये बदल करून आक्रमकपणा पुढे आणणार आहोत. आमदार-खासदारही पक्षासमवेतच आहेत.'
अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीबाबत शिंदे म्हणाले, " राम, मंदिर व धर्माच्या नावाखाली सत्ता घेऊन पैसा कमवायचा प्रकार सुरु आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही त्यावर टीका केली आहे. त्यामुळे राम मंदिराच्या देणग्या गेल्या कुठे ? चोरी केलेल्या देणग्यांचा कोणत्या पक्षाने वापर केला आहे का ? असे प्रश्न उपस्थित होत आहे.नाशिकच्या कुंभमेळ्यातही रस्ते बांधकामात २३०० कोटी रूपयांचा घोटाळा झाल्याचे विधीमंडळात प्रश्न आला होता. काही गुजरातचे कंत्राटदार नाशिकमध्ये काम करत आहेत. धर्माच्या नावाखाली कामे करायची आणि पैसा कमवायचा, हा नवीन अजेंडा राज्यात भाजपच्या माध्यमातून पहायला मिळत आहे. त्यामुळे रामभक्त, हिंदुंमध्येही मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळे आम्हीही आंदोलन करणार आहोत.'
मिसिंग लिंकवरील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
मिसिंग लिंकवरील निकृष्ट दर्जाच्या कामासह राज्यात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या दर्जावरही शिंदे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "सर्वत्र सत्ता असूनही निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत. कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करत असून, सार्वजनिक निधीचा योग्य वापर होत नाही, राज्यात ठराविक कंत्राटदारांची साखळी सक्रीय असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला.
शशिकांत शिंदे म्हणाले,
- १५ ऑगस्टपासून पक्षाच्या आमदार-खासदारांचे राज्यव्यापी दौरे
- कलाकारांपासून आमदारांपर्यंत खंडणीचे प्रकार, गृहखाते व पोलिसांचा वचक संपला.
- आपल्यामागे वरदहस्त असल्याची गुन्हेगार व अधिकाऱ्यांची भावना
- शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली काम करू असे अमोल कोल्हेंनी सांगितले आहे.