500 मिमी पाऊस पडूनही 'हिंदमाता' जलमुक्त! बीएमसीच्या 'फ्लड मिटिगेशन' प्रकल्पाची कमाल
एबीपी माझा ब्युरो July 05, 2026 01:13 AM

Mumbai Rain Update : मुंबई आणि उपनगरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. उपनगरांमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळणे, उघड्या मॅनहोलमुळे झालेली दुर्घटना, आणि अंधेरी सबवे पुन्हा एकदा पाण्याखाली जाणे अशा अनेक चिंताजनक आणि नकारात्मक घटनांनी संपूर्ण मुंबई हादरली आहे. मात्र, या सर्व गंभीर घडामोडींच्या आणि दाट पाऊसाच्या सावटात मुंबईकरांसाठी एक अत्यंत आशादायक, सकारात्मक चित्रही समोर आले आहे.

कधीकाळी मुंबईत मुसळधार पावसाचे नाव काढताच सर्वप्रथम पाण्याखाली जाणारा आणि मिडियाच्या हेडलाईन्समध्ये राहणारा 'हिंदमाता' (Hindmata) परिसर यंदा तब्बल 500 मिमीहून अधिक विक्रमी पाऊस पडूनही मोठ्या जलभरावापासून पूर्णपणे सुरक्षित आणि जलमुक्त राहिला आहे. एकेकाळी अनेक दिवस गुडघाभर पाण्यात बुडणारा हा परिसर यावेळी मुंबईकरांसाठी मोठा दिलासादायक ठरला असून, यामागे बृहन्मुंबई महानगरपालिकेचा (BMC) 'फ्लड मिटिगेशन' प्रकल्प आहे.

काय आहे हिंदमाता 'फ्लड मिटिगेशन' प्रकल्प?

मुंबईचा सखल भाग असलेल्या हिंदमाता परिसराला पुराच्या पाण्यातून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी बीएमसीने आधुनिक अभियांत्रिकीचा वापर करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवला आहे. या संपूर्ण यंत्रणेमध्ये प्रत्येकी ताशी 3,000 घनमीटर पाणी उपसण्याची अवाढव्य क्षमता असलेले तब्बल 15 अत्याधुनिक पंप कार्यरत ठेवण्यात आले आहेत. पावसाचे पाणी रस्त्यावर साचू नये म्हणून जमिनीखाली तब्बल 6.4 कोटी लिटर क्षमतेच्या दोन अजस्त्र भूमिगत जलसाठा टाक्यांची करण्यात आली आहे. हिंदमाता आणि आजूबाजूच्या सुमारे 105 हेक्टर परिसरातील पावसाचे पाणी अवघ्या काही मिनिटांत उपसून बाहेर काढण्याची अफाट क्षमता या अत्याधुनिक यंत्रणेमध्ये आहे.

यंदाच्या पावसात प्रकल्पाची 'अग्निपरीक्षा'

यंदा मुंबईत झालेल्या विक्रमी पावसात बीएमसीच्या या भूमिगत टाक्यांच्या प्रकल्पाने स्वतःची खरी कसोटी अत्यंत यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. मुसळधार पाऊस सुरू असताना रस्त्यावरील पाणी थेट पाइपलाइनद्वारे या अंडरग्राउंड टाक्यांमध्ये वळवण्यात आले आणि पाऊस ओसरताच ते समुद्रात पंप करण्यात आले. 

योग्य नियोजन, आधुनिक अभियांत्रिकी आणि जमिनीवरील प्रभावी अंमलबजावणी असेल तर मुंबईतील जुनाट जलभरावाची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते, हे या प्रकल्पाने प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.

हिंदमाता मॉडेल इतर भागांत कधी लागू होणार?

हिंदमाता मॉडेल जर इतके प्रभावी ठरले आहे, तर दादर, सायन, अंधेरी सबवे, कुर्ला, किंग्ज सर्कल आणि मुंबईतील इतर शेकडो जलभरावग्रस्त भागांसाठीही अशाच प्रकारचे कायमस्वरूपी उपाय बीएमसी कधी करणार? असा प्रश्न आता विचारला जात आहे. 

दरवर्षी पावसाळ्यात मुंबई ठप्प झाल्यावर पालिकेकडून केवळ कोट्यवधी रुपयांच्या नालेसफाईचे दावे आणि आश्वासने दिली जातात. मात्र, आता मुंबईकरांना केवळ पोकळ आश्वासने नकोत, तर हिंदमाताप्रमाणे प्रत्यक्ष जमिनीवर निकाल देणारे कायमस्वरूपी प्रकल्प हवे आहेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.