मुंबई, कोकणासह राज्यभरात पावसाचं थैमान; राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा; हवामान विभागाकडून महत्वाच्या सूचना जारी, वाचा सर्व अपडेट्स
एबीपी माझा वेब टीम July 05, 2026 09:43 AM

Maharashtra Weather : राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर (Maharashtra Rain) वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. विशेषत: मुंबईसह ठाणे पालघर आणि कोकणातही जोरदार पाऊस (Rain) पडत आहे. अशातच आजपासून (5 जुलै) पुढील दोन दिवस राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच नागरिकांना घराबाहेर पडावं अशा सूचना हवामान खात्याने (Maharashtra Weather Update) दिल्या आहेत. तर आज रविवार, दिनांक 5 जुलै 2026 रोजी मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीचा (Red Alert) इशारा हवामान विभागानं दिला आहे. तर दुसरीकडे राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा दिला असून इतर 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि 14 जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यानं (India Meteorological Department) पावसाचा यलो अलर्ट वर्तवलेला आहे. 

Maharashtra Rain : राज्यातील 5 जिल्ह्यांना रेड अलर्टचा इशारा, पुढील 48 तास महत्वाचे

एकीकडे रायगड जिल्ह्यात पावसाचे रौद्ररूप पाहायला मिळत असताना कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता असून ऑरेंज अलर्टचा अंदाज आहे. तर तिकडे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि घाटमाथा परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याच विभागांना रेड अलर्टचा अंदाज वर्तवलेला आहे. सोबतच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्टचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. नाशिक घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला. अशातच विदर्भ विभागातील अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Gondia Rain : 5 दिवसांच्या पावसाने भरून निघाला बॅकलॉग; गोंदिया जिल्ह्यात सरासरी 240.4 मिमी पावसाची नोंद

एल निनोच्या प्रभावामुळे यावर्षी कमी प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. गोंदिया जिल्ह्यात जून महिन्यात केवळ 53.7 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांसह गोंदिया जिल्हावासीयांची चिंता वाढली होती. पण 30 जून ते 4 जुलै याच 5 दिवसांच्या कालावधीत गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्याने 240.4 मिमी पावसाची नोंद झाल्याने गेल्या महिनाभरातील बॅकलॉग भरून निघाल्याने शेतकऱ्यांसह जिल्हावासीय सुद्धा सुखावले आहे. तर गोंदिया, आमगाव, गोरेगाव, सालेकसा या 4 तालुक्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली आहे... गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले हे दुथळी भरून वाहत असून नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.