>> आशुतोष बापट
[email protected]
दक्षिण भारतातले एक बलाढ्य घराणे म्हणून चोळ घराण्याचा उल्लेख करावा लागेल. भारतातल्या प्रमुख आणि प्राचीन घराण्यांपैकी हे एक घराणे आहे. अनेक प्राचीन ग्रंथांतून, साहित्यातून आपल्याला या घराण्याचा उल्लेख सापडतो. चोळ ही दक्षिण भारतातली एक प्रबळ शक्ती होती. चोळांच्या काळात विविध कलांना बहर आला होता. चोळ राजे कलेचे भोत्ते होते तसेच त्यांनी विविध कला आणि कलाकारांना आश्रय दिला होता. त्यामुळे त्यांच्या कारकीर्दीत अनेक कलांचा विकास झाला. चोळांचे स्थापत्य हे तर प्रेक्षणीय आहेच, पण त्याबरोबर त्यांच्या काळातील चित्रकला आणि मूर्तिकला या कलासुद्धा उत्कर्षाला पोचल्या होत्या.
चित्रकला -चोळयुगात चित्रकलेचा खूप विकास झाला. चोळांच्या काळात काही उत्कृष्ट भित्तिचित्रे निर्माण झाली होती, असे उल्लेख वाङ्मयात सापडतात, पण ती चित्रे सध्या कुठे दिसत नाहीत. ती कालौघात नष्ट झाली असणार. मात्र तंजाऊरच्या बृहदीश्वर देवालयातील प्रदक्षिणा मार्गावर जी सुंदर भित्तिचित्रे आहेत, ती राजराज पहिला व राजेंद्र पहिला या चोळ राजांच्या काळातली आहेत. तंजाऊरची चित्रे ज्या पार्श्वभूमीवर काढलेली आहेत, ती पार्श्वभूमी प्रथम खरखरीत चुन्याचा गिलावा आणि त्यावर परत पातळ चुना लावून बनवलेली आहे. त्यावरची ती चित्रे फेस्को पद्धतीने म्हणजे गिलावा ओला असतानाच काढलेली आहेत. पेरीय पुराणात वर्णिलेले कित्येक प्रसंग या चित्रांत दिसतात. एका भिंतीवर नटराजाचे भव्य चित्र आहे, तर दुसऱया ठिकाणी त्रिपुरांतक शिवाचे चित्र आहे.
त्यात भैरव आणि नटराज यांच्या आकृत्या दिसतात. ती चित्रे इ. स. च्या बाराव्या किवा तेराव्या शतकातील असावीत असे अभ्यासकांचे मत आहे. मूर्तिकला – चोळ राजांच्या वेळी जी मंदिरे निर्माण झाली, त्यात पाषाणाच्या अनेक सुंदर मूर्ती पाहायला मिळतात. त्यांतील वीणाघर दक्षिणामूर्ती (तिरुक्कट्टळै), अर्धनारीश्वर (कोडंबाळूर), नटराज व लिंगोद्भव (तिरुवालीश्वरम्) या मूर्ती विशेष उल्लेखनीय आहेत. गंगैकोंडचोळपुरम इथल्या मंदिरावर असलेली शिवाची ‘चंदेशानुग्रह’ मूर्ती म्हणजे चोळ मूर्तिकलेचा परिपाक असल्याचे जाणवते. इतकी सुंदर, देखणी, आणि जिवंत भासावी अशी मूर्ती कितीही वेळ बघत बसलो तरी समाधान होत नाही. चोळ वंशाच्या काळातील अनेक धातुमूर्ती सापडल्या आहेत. त्या इतक्या उत्कृष्ट आहेत की, त्या काळी धातू ओतून मूर्ती बनवण्याची कला परिणत अवस्थेला पोचली होती याची साक्ष आहे. दक्षिण भारतातील काही देवालयांत नटराजाच्या भिन्न प्रकारच्या सुरेख धातुमूर्ती असून त्यांची नित्य पूजा केली जाते. शिवाच्या इतर प्रकारच्या धातुमूर्तीही त्या काळी निर्माण झाल्या. त्यांतील किरातमूर्ती उत्कृष्ट आहे, पण त्यातील सर्वांगसुंदर मूर्ती कुंभकोणमजवळ असलेल्या कोनेरीराजपुराम मंदिरात चोळ राणी सेंबियन महादेवीने तयार करून घेतलेली नटराजाची धातुमूर्ती आहे.
स्थापत्य व शिल्पकला – द्रविड शिल्पशैलीचा उगम इ. स. च्या 7 व्या शतकात पल्लवांच्या काळातच झाला होता. त्याच शैलीचा विकास चोळ वंशाच्या राजवटीत झाला. इ. स. 850 ते 985 हा चोळ शिल्पशैलीच्या विकासातील पहिला कालखंड होय. त्यांच्या शिल्पकामात नावीन्य व चैतन्य असल्यामुळे एक नवीन शिल्पशैली निर्माण करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. इ. स. च्या 9 व्या शतकात किलैयूर इथे आदित्य पहिला याने उभारलेले अगस्त्येश्वराचे मंदिर त्या शिल्पशैलीचा एक उत्कृष्ट नमुना आहे. त्यानंतरचा इ. स. 1070 पर्यंतचा कालखंड चोळ वंशाच्या इतिहासात अत्यंत वैभवशाली ठरला. या अवधीत चोळ शिल्पकलेने व स्थापत्यकलेनेही वैभवाचे शिखर गाठले होते. या कालखंडात चोळांच्या विस्तीर्ण साम्राज्यात असंख्य मंदिरे निर्माण झाली. मात्र तंजाऊरचे राजराजेश्वर (बृहदीश्वर) मंदिर व गंगैकोंडचोळपुरम् येथील मंदिर ही दोन मंदिरे विशेष वर्णनीय आहेत. तंजाऊरचे मंदिर इ. स. 1010 च्या सुमारास पूर्ण झाले. त्याचे विमान 13 मजली असून त्याच्यावर एक प्रचंड घुमटाकार कळस चढवलेला आहे. या शिल्पकामाचा भव्यपणा, सुबकपणा, साधेपणा, डौलदारपणा आणि गाभाऱयातील प्रचंड शिवलिंग पाहून आश्चर्याने चकित व्हायला होते.
राजराजाचा मुलगा राजेंद्र पहिला याने बांधलेले गंगैकोंडचोळपुरम इथले बृहदीश्वर मंदिर हे तंजाऊरच्या मंदिराची प्रतिकृतीच आहे. मात्र त्याच्या विमानावर विपुल नक्षीकाम असल्यामुळे त्याचे सौंदर्य आगळेच वाटते. कुलोत्तुंगाच्या राज्याभिषेकापासून पुढील वर्षांचा काळ हा चोळशिल्पाच्या विकासाचा तिसरा कालखंड होय. या काळात देवालयाचा प्राकार अधिक विस्तृत झाला, त्यातील उपमंदिरांची संख्या वाढली व गोपुरांची उंचीसुद्धा वाढली. शंभर किंवा हजार स्तंभांचे मंडप बांधण्यास याच काळात प्रारंभ झाला. राजराज दुसरा याने बांधलेले दारासुरम येथील ऐरावतेश्वराचे मंदिर व कुलोत्तुंग तिसरा याने त्रिभुवनम येथे बांधलेले कंपहरेश्वराचे मंदिर ही दोन मंदिरे विशेष उल्लेखनीय आहेत. ऐरावतेश्वराच्या महामंडपाला रथाची चाके लावलेली दिसतात.
प्रचंड मोठा प्राकार, प्रवेशद्वारांवर असलेली उंचच उंच गोपुरे, एकात एक दोन सभा मंडप आणि तेसुद्धा 40-50 खांब असलेले, सभा मंडपातसुद्धा उपमंदिरे, नंतर अंतराळ आणि मुख्य गाभाऱयात शिवलिंग अशी सर्वसाधारणपणे चोळ मंदिरांची रचना आहे. त्यातली वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे आपण पुढे बघणार आहोतच. ही मंदिरे बघताना शिल्पकला, मंदिर स्थापत्य ही कला किती उन्नत अवस्थेला पोचली होती याची जाणीव होते.