इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनींच्या अंत्ययात्रेला रणरणत्या उन्हात कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसमुदाय; भारतासह 100 देशांचे प्रतिनिधी हजर, अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत
परशराम पाटील, एबीपी माझा July 05, 2026 04:13 PM

Ayatollah Ali Khamenei: तब्बल चार महिन्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी (Ayatollah Ali Khamenei) यांना शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण इराणच्या रस्त्यांवर कोट्यवधींचा अभूतपूर्व जनसागर उसळला आहे. खमेनी यांच्या मृत्यूनंतर तब्बल चार महिन्यांनी होत असलेल्या या ऐतिहासिक अंत्ययात्रेत केवळ इराणमधूनच नव्हे, तर संपूर्ण जगातून लाखो-कोट्यवधी नागरिक आपल्या सर्वोच्च नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. 'अमेरिकेचा नाश असो', 'इस्रायलचा नाश असो' आणि 'बदला' अशा गगनभेदी घोषणांनी तेहरानचे रस्ते दुमदुमून गेले. हातात इराणी राष्ट्रध्वज आणि 'आम्ही एकत्र उभे राहू' अशा घोषणा असलेले फलक घेऊन कोट्यवधींचा हा समुदाय आपल्या लाडक्या नेत्याच्या अंतिम दर्शनासाठी तासनतास रांगेत उभा आहे.

सात दिवसांचा ऐतिहासिक अंत्यविधी सोहळा

अयातुल्ला खमेनी यांचा अंत्यसंस्कार सोहळा 3 जुलै ते 9 जुलै 2026 या सात दिवसांच्या कालावधीत इराण आणि शेजारील इराक अशा दोन्ही देशांमधील प्रमुख धार्मिक स्थळांवर पार पडत आहे. 

3 आणि 4 जुलै (तेहरान)

तेहरानमधील 'इमाम खोमेनी ग्रँड मोसल्ला' संकुलात अयातुल्ला खमेनी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. या ठिकाणी कोट्यवधींच्या उपस्थितीत मुख्य जाहीर प्रार्थना (जनाझा) पार पडली.

5 जुलै (कोम - Qom)

यानंतर पार्थिव इराणचे मुख्य धार्मिक केंद्र असलेल्या 'कोम' या पवित्र शहरात प्रांतीय धार्मिक विधींसाठी नेण्यात येणार आहे.

7 जुलै (इराक - नजफ आणि कर्बला)

खमेनी यांचे पार्थिव शेजारील मित्रराष्ट्र असलेल्या इराकमध्ये नेले जाईल. तिथे शिया धर्मीयांची अत्यंत पवित्र स्थळे असलेल्या 'नजफ' आणि 'कर्बला' शहरांमधून अंत्ययात्रा काढली जाईल.

8 आणि 9 जुलै (मशहद)

अंत्यविधीच्या अंतिम टप्प्यात पार्थिव इराणमधील 'मशहद' येथे आणले जाईल. 9 जुलै रोजी याच ठिकाणी त्यांचे दफन करून अंत्यविधी पार पडेल. 

 

कुटुंबातील इतर सदस्यांवरही होणार अंतिम संस्कार

28 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या हवाई हल्ल्यात अयातुल्ला खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील इतर चार सदस्यही मारले गेले होते. यामध्ये त्यांची मुलगी, जावई, सून (नवे सर्वोच्च नेते मोजताबा खमेनी यांच्या पत्नी) आणि एका लहान नातीचा समावेश आहे. खमेनी यांच्या मुख्य कफनपेटीसोबत या सदस्यांच्या छोट्या कफनपेट्याही संपूर्ण अंत्ययात्रेत सोबत ठेवण्यात आल्या आहेत. या सर्व सदस्यांवरही पूर्ण शासकीय आणि धार्मिक इतमामात, कौटुंबिक प्रोटोकॉलनुसार खामेनी यांच्यासोबतच अंतिम संस्कार केले जात आहेत.

पवित्र 'इमाम रेझा दर्ग्यात' होणार दफनभूमी

अयातुल्ला अली खमेनी यांच्या पार्थिवाचे दफन 9 जुलै रोजी इराणमधील मशहद शहरातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या 'इमाम रेझा दर्गा' (Imam Reza Shrine) परिसरात केलं जाईल. हे शिया पंथातील आठवे इमाम यांचे पवित्र स्थान असून, संपूर्ण इराणमधील हे सर्वात पवित्र आणि आदराचे केंद्र मानले जाते. याच ठिकाणी खमेनी कायमचे विसावतील.

जगभरातून 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी हजर; भारताचेही शिष्टमंडळ

या ऐतिहासिक अंत्यसंस्कारासाठी जगातील 100 हून अधिक देशांचे प्रमुख आणि उच्चपदस्थ राजदूत इराणमध्ये दाखल झाले आहेत. यामध्ये इराक, जॉर्जिया, ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष आणि पाकिस्तान, आर्मेनियाचे पंतप्रधान यांचा समावेश आहे. भारताच्या वतीने एक मोठे अधिकृत शिष्टमंडळ पाठवण्यात आले आहे. यामध्ये बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पबित्र मार्गेरिटा आणि विरोधी पक्षाचे प्रतिनिधी म्हणून माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद यांचा समावेश आहे.

5 हजार मशिदी छावण्यांमध्ये रूपांतरित; सुरक्षा व्यवस्था कडक

  • युद्धविरामानंतर इराणमध्ये होत असलेल्या या सर्वात मोठ्या कार्यक्रमासाठी सुरक्षेचे अभूतपूर्व नियोजन करण्यात आले आहे:
  • संपूर्ण सुरक्षा आणि वाहतूक व्यवस्था 'इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स' (IRGC) च्या ताब्यात आहे.
  • तेहरानमध्ये आलेल्या कोट्यवधी भाविकांच्या राहण्यासाठी 5 हजार मशिदी आणि 700 शाळांचे तात्पुरत्या छावण्यांमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. रेड क्रिसेंटने (Red Crescent) मियात पार्कमध्ये 1 हजार तंबू ठोकले आहेत.
  • गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि इंटरनेटचा खोळंबा टाळण्यासाठी तेहरानमधील 10 प्रमुख केंद्रांवर विशेष हाय-स्पीड फायबर-ऑप्टिक इंटरनेट हब उभारण्यात आले आहेत.

मोजताबा खामेनी कुठे आहेत?

दरम्यान, इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे सुपुत्र आणि त्यांचे उत्तराधिकारी (नवे सर्वोच्च नेते) मोजताबा खमेनी हे गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून सार्वजनिक ठिकाणी दिसलेले नाहीत. फेब्रुवारी 2026 मध्ये अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या एका संयुक्त हवाई हल्ल्यात त्यांच्या वडिलांची (अयातुल्ला खमेनी) हत्या झाली होती, तेव्हापासून ते लोकांसमोर आलेले नाहीत.

अंत्यसंस्कारालाही राहणार अनुपस्थित

इराणच्या अधिकृत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 56 वर्षांचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी सध्या तेहरानमध्ये सुरू असलेल्या आपल्या वडिलांच्या 6 दिवसांच्या जाहीर अंत्यसंस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. इस्रायलकडून त्यांच्या जीवाला अद्याप धोका असल्याने आणि त्यांच्या हत्येची शक्यता असल्याने, केवळ सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.

हल्ल्यात झाले होते जखमी

असे सांगण्यात येत आहे की, ज्या हवाई हल्ल्यात त्यांचे वडील मारले गेले, त्याच हल्ल्यात मोजताबा खमेनी हे स्वतःदेखील गंभीर जखमी झाले होते. जरी मोजताबा खमेनी सार्वजनिक लोकांसमोर आले नसले, तरी इराणच्या सरकारी मीडियाद्वारे त्यांच्या नावाचे अनेक लिखित संदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायल काय म्हणाले?  

इराणमधील या अभूतपूर्व जनसागरावर आणि घडामोडींवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलने बारीक लक्ष ठेवले आहे. इस्रायली पंतप्रधानांसोबतच्या संबंधांचा उल्लेख करत त्यांनी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, इस्रायलने आपले लष्कर हाय-अलर्टवर ठेवले असून, इराकपर्यंत जाणाऱ्या या अंत्ययात्रेच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.