शिंदेंच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का, राष्ट्रवादीने गुपचूप केला मोठा गेम; नाशिकमधून मोठी बातमी!
Tv9 Marathi July 05, 2026 09:45 PM

Nashik Politics : राज्याच्या राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. भविष्यातील सोय लक्षात घेऊन नेतेमंडळी सध्या पक्षांतर करताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर निवडणुकीनंतर मोठा घोडेबाजार पाहायला मिळाला. दरम्यान, आता नाशिकच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये महायुतीमध्येच एकमेकांवर कुरघोडी करण्यात आली आहे. येथे शिवसेनेला जबर धक्का बसला असून राष्ट्रवादी पक्षाने शिवसेनेचा मोठा गेम केला आहे.

नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये शिवसेनेचे सात नगरसेवक राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात सामील होण्याच्या तयारीत आहेत. पडद्यामागे तशा हालचाली सुरू आहेत. माजी खासदार तथा राष्ट्रवादीचे नेते समीर भुजबळ याचंच्या उपस्थितीत नुकतेच महायुतीच्या नगरसेवकांची एक बैठक पार पडली. या बैठकीत याबाबात चर्चा करण्यात आली.

किशोर दराडे यांना जबर धक्का बसण्याची शक्यता

सात नगरसेवक राष्ट्रवादीला साथ देण्याच्या तयारीत असल्याने तिथे आमदार किशोर दराडे यांना जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. किशोर दराडे व कुणाल दराडे यांच्या कार्यशैलीवर हे नगरसेवक नाराज असल्याचे बोलले जात आहे. समीर भुजबळ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत नगरसेवकांनी याबाबत खंत व्यक्त केल्याचेही बोलले जात आहे.

येवल्यातील शिवसेनेची ताकद कमी व्हायला सुरुवात

नुकतेच पार पडलेल्या नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांना जबर धक्का बसला. तिथे अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांचा विजय झाला. या पराभवानंतर येवल्यातील शिवसेनेची ताकदही कमी होऊ लागल्याचे चित्र चित्र पाहायला मिळत आहे. तसा दावा केला जातोय. दराडेंच्या पराभवानंतर येवल्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता सात नगरेसवक राष्ट्रवादीत जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, महायुती म्हणून नगरसेवक आमच्याकडे आले आहेत. महायुती म्हणून आम्ही सोबत काम करू अशी प्रतिक्रिया समीर भुजबळ यांनी दिली आहे. त्यामुळे आता नाशिकच्या राजकारणात भविष्यात नेमकं काय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.