बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेसची डोकेदुखी! रस्त्यात बंद पडल्या की मेकॅनिकशिवाय हटत नाहीत; मेकॅनिक तैनात ठेवा, वाहतूक पोलिसांचे बेस्टला पत्र
Marathi July 06, 2026 07:25 AM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

>> आशिष बनसोडे

ठिकठिकाणी सुरू असलेली कामे, पावसाची संततधार, रस्त्यांची दुरवस्था यामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजले असतानाच बेस्टने भाडेतत्त्वावर घेतलेल्या इलेक्ट्रिक बसेस समस्या बनू पाहत आहेत. या बसेस रस्त्यात बंद पडल्या की त्यांना ‘टोव्ह’ करणे शक्य होत नाही. परिणामी त्याचा वाहतुकीवर परिणाम होतो. मेकॅनिक आल्याशिवाय बस हटविता येत नाही. त्यामुळे बेस्टने आवश्यक ठिकाणी मेकॅनिक तैनात ठेवावेत, अशी सूचना वाहतूक पोलिसांनी बेस्ट प्रशासनाला केली आहे.

शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी याकरिता मुंबई वाहतूक पोलीस सर्वतोपरी उपाययोजना करत आहेत. रस्त्यात एखादे वाहन बंद पडले तर ते पटकन तेथून दूर करता यावे याकरिता शहरात 41हून अधिक टोव्ह क्रेन तैनात ठेवल्या आहेत. शिवाय बॅरेकेटिंग करून वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याचादेखील प्रयत्न केला जातो. मात्र बेस्टच्या इलेक्ट्रिक बसेसचा वेगळाच त्रास आहे. भाडेतत्त्वावर घेतलेली इलेक्ट्रिक बस रस्त्यात बंद पडली तर ती टोव्ह करून हटवणे शक्य होत नाही. कारण या बसची चाके जाम होऊन जातात. टोव्ह करण्याचा प्रयत्न केला तरी चाके फिरत नाहीत. अशा प्रसंगी मेकॅनिकचीच गरज पडते. हे लक्षात घेत वाहतूक पोलिसांनी दोन वेळा बेस्ट प्रशासनाला पत्र दिले असून अधिकाऱ्यांसमवेत बैठकादेखील घेतल्या आहेत. शहरात आवश्यक ठिकाणी आपले मेकॅनिक तैनात ठेवा, जेणेकरून बस बंद पडल्यावर पटकन दुरुस्त करून ती हटवता येईल, असे पत्रात नमूद केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. शिवाय शक्य झाल्यास चालक व वाहकालादेखील प्रशिक्षण द्यावे, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत त्यांची मदत होईल, असेही सुचविण्यात आल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.

पथके शहरात तैनात करण्यात आली आहेत आणि परस्पर समन्वयही आधीपासूनच आहे. आम्ही संयुक्त बैठकही घेतली आहे. कामे सुरळीतपणे सुरू आहेत. खासगी बसेसनादेखील याबाबत कळविले आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्यावर आमचा भर आहे. – सत्यनारायण चौधरी, सहआयुक्त (वाहतूक)

बेस्ट व संबंधित बसेसच्या कंत्राटदारांना मेकेनिकल प्रत्येक डेपोत तैनात ठेवण्याच्या  सूचना देण्यात आल्या आहेत. कॉल आल्यावर पटकन घटनास्थळी मेकेनिकल्सना रवाना करता येईल अशा उपाययोजना केल्या जात आहेत. – लालसा विश्वासराव, बेस्ट समिती अध्यक्षा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.