Mumbai Rain News Updates : कर्मचाऱ्यांना दुपारनंतर सुट्टी, खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम होमचे आदेश; सरकारचा मोठा निर्णय
Tv9 Marathi July 06, 2026 04:45 PM

राज्यभरात वरूणराजाने चांगलाच जोर धरला असून सर्वत पावसाच्या मुसळधार सरी कोसळत आहेत. तीन दिवसांपासून अविरत पडणाऱ्या पावसाने अनेक धरणं, तलाभ भरून वाहू लागले आहेत, तसेच काही नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलांडली आहे. काही भागांत रस्ते टखचले, मिसिंग लिंक तसेच मुंबई-पुणे मार्गावर सततच्या पावसामुळे दरड कोसळल्याने वाहतूकही ठप्प झाली. रेल्वे मार्ग, रस्ते वाहतूक मार्ग बंद असल्याने नागरिकांचेही हाल होत आहेत. राज्यात बहुतांश भागात पावसाचा कहर असून मुबईतही काही वेगळी स्थिती नाही. मुंबई आणि उपनगरांमध्येही पावसाच्या सरी तीन दिवसांपासून सतत कोसळत आहेत. त्यामुळे अनेक भागांत पाणी साचलं असून रेड अलर्ट देण्यात आला असून शाळा, कॉलेजेसनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

बदलापूरच्या उल्हास नदीने रौद्र रूप धारण केलं असून उल्हास नदीने धोक्याचे पातळी ओलांडल्यानंतर पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे. पुढील दोन ते तीन तास अत्यंत महत्त्वाचे असून पूरपरिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. तर मुंबईतही अनेक भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली असून रेल्वे रुळांवर पाणी आल्याने रेल्वे वाहतूकही काही काळ मंदावल्याचे दिसून आले. पावसामुळे रेल्वेला विलंब होत असून ऑफीसला निघालेल्या तसेच कामासाठी बाहेर पडणारे नागरिक अडकून पडले आहेत, त्यांना गर्दीचाही सामना करावा लागत आहे. त्यातच आता भारतीय हवामान विभागाने मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे. आता 80 ते 90 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

वर्क फ्रॉम होमचे आदेश

भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी ८० ते ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी मुंबईतील सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याचे (Work From Home) निर्देशित केले आहे. तसेच, शासकीय/ निमशासकीय (अत्यावश्यक सेवा वगळून) कर्मचाऱ्यांना दुपारनंतर अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.