पुणे : आळंदी येथील पूरस्थितीमुळे पालखी सोहळ्यातील वारकरी दोन दिवस आधीच पुण्यात मुक्कामी असणार आहेत. त्यामुळे महापालिकेने शहरात सुरू असलेली पाणी कपात मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ७ जुलै ते १२ जुलै या कालावधीत शहरातील सर्व भागात पूर्ण पाणी पुरवठा होणार आहे. तोपर्यंत धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली तर ही पाणी कपात पुढे ठेवायची की नाही याचा निर्णय नंतर जाहीर केला जाणार आहे. महापौर मंजूषा नागपुरे यांनी ही माहिती दिली.
पुणे जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यातच आज (ता. ६) जिल्ह्यातील अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलै रोजी आळंदी येथून होणार आहे. पण आळंदीला जोडणारे इंद्रायणी नदीवरील पूल पुरामुळे पाण्याखाली गेले आहेत. वारकरी आळंदीत जाणे शक्य नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारकऱ्यांनी पुण्यात राहावे, आळंदीत येऊ नये असे आवाहन केले आहे. त्यानंतर महापौर नागपुरे यांनी प्रशासनाची तातडीची बैठक घेऊन हा निर्णय घेतला.
वाहतूक नियोजन करा
शहरात येणाऱ्या दिंड्यांची वाहने आणि वारकऱ्यांची गर्दी लक्षात घेऊन वाहतुकीचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना पोलिस आयुक्त आणि वाहतूक शाखेला देण्यात आल्या आहेत. पालखी सोहळा पुण्यात आल्यानंतर वाहतूक पोलिसांकडून रस्ते बंद करणे, पर्यायी मार्ग कळविणे याचे नियोजन केले जाते. पण आता अतिवृष्टीमुळे अचानक वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम वाढला आहे. दिंड्यांचे ट्रक, अन्य वाहने शहरात रस्त्याच्या कडेला लागतात. काही ठिकाणी छोटे रस्ते बंद करावे लागतात. यंदा पुढील चार ते पाच दिवस हिच स्थिती असणार आहे. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये आणि वारकऱ्यांच्या वाहनांना कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी व्यवस्थित नियोजन करावे. त्यानुसार अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करावा असे वाहतूक पोलिसांना कळविण्यात आले असल्याचे नागपुरे यांनी स्पष्ट केले.