Pune Flood: इंद्रायणी नदीला पूर, वडगाव शिंदेत घरांत पाणी; १५ ते २० नागरिकांना अग्निशामक दलाने सुरक्षितस्थळी हलविले
esakal July 07, 2026 01:45 AM

पुणे : इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी गाठल्याने हवेली तालुक्यातील वडगाव शिंदे गावाला पुराचा मोठा फटका बसला. नदीचे पाणी काही घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले. धानोरी अग्निशामक केंद्राच्या जवानांनी बचाव मोहीम राबवून १५ ते २० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले.

सोमवारी मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली. त्यानंतर नदीचे पाणी वडगाव शिंदे गावातील घरांमध्ये शिरले. अनेक कुटुंबे घरांमध्येच अडकून पडली. काही घरांमध्ये चार ते पाच फूट पाणी साचल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच धानोरी अग्निशामक केंद्राचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

परिस्थितीचा आढावा घेत बचावकार्य सुरू केले. पाण्याने वेढलेल्या घरांमध्ये अडकलेल्या सुमारे १५ ते २० रहिवाशांना दोरीच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. पूराच्या पाण्यामुळे अनेक घरांतील संसारोपयोगी वस्तूंचे नुकसान झाले असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.