पुणे - गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी (ता. ६) शहर आणि उपनगरात अक्षरशः रौद्ररूप धारण केले. दुपारनंतर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने अवघ्या काही तासांत पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडाली. रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले, अनेक सखल भाग जलमय झाले, तर अनेक ठिकाणी वाहने बंद पडल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. झाडपडीच्या घटना, कोसळलेल्या सुरक्षाभिंती, घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांसह व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. एकंदरीत मुसळधार पावसाने संपूर्ण शहरातील जनजीवन विस्कळित झाले.
रस्त्यांवर पाण्याचे लोट
गेल्या चोवीस तासांत शिवाजीनगरमध्ये १०८.४ मिलिमीटर, तर चिंचवडमध्ये सर्वाधिक २०६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे पुणेकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील प्रमुख रस्ते पाण्याखाली गेले. गणेशखिंड रस्ता, सेनापती बापट रस्ता, शिवाजीनगर, एरंडवणा, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कात्रज, स्वारगेट, बाणेर-बालेवाडी, औंध, हडपसर, विमाननगर, लोहगाव, नऱ्हे, नगर रस्ता आणि कोंढवा परिसरात पाण्याचे लोट वाहत होते. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना रस्त्यांचा अंदाज येत नव्हता.
सोसायट्यांच्या सुरक्षाभिंती कोसळल्या
शहरात सुरू असलेल्या मेट्रो आणि उड्डाणपुलांच्या कामांमुळे वाहतुकीची समस्या अधिकच गंभीर झाली. पावसाचे पाणी साचल्याने कात्रज-कोंढवा रस्ता, नगर रस्ता, सिंहगड रस्ता, गणेशखिंड रस्ता आणि शिवाजीनगर परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
व्यापाऱ्यांचे नुकसान
घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य, किराणा माल आणि इतर वस्तूंचे नुकसान झाले. व्यापाऱ्यांना दुकानांमधील माल बाहेर काढण्यासाठी धावपळ करावी लागली. अनेक व्यावसायिकांना दिवसभर व्यवहार बंद ठेवावे लागल्याने आर्थिक फटका बसला. विविध भागांत वीजपुरवठा खंडित झाला.
झाडपडीच्या ५१ घटना
शहरात मुसळधार पावसामुळे झाडपडीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली. रविवारी सायंकाळी पाच ते सोमवारी दुपारी एक या कालावधीत झाडे पडण्याच्या एकूण ५१ घटना घडल्या. कोथरूड, सेनापती बापट रस्ता, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, लोकमान्यनगर, एरंडवणे, येरवडा, शुक्रवार पेठ, धायरी, नऱ्हे, औंध, सिंहगड रस्ता, वडगाव आणि शिवाजीनगर परिसरात प्रामुख्याने झाडपडीच्या घटना घडल्याने अग्निशमन दलाने सर्व घटनास्थळी तातडीने धाव घेत झाडे हटविण्याचे काम पूर्ण केले. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाल्याची नोंद नाही.
हवामान विभागाचा इशारा
पुणेकरांची या पावसानंतरही सुटका होण्याची चिन्हे नाहीत. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील दोन ते तीन दिवस पुणे शहर आणि जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घ्यावी आणि गरज असल्यासच घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.