चाकण - खेड तालुक्यातील खराबवाडी आरुवस्ती येथे मुसळधार पावसामुळे इमारतीभोवती पाणी साचून अडकलेल्या ६५ नागरिकांना ‘एनडीआरएफ’च्या पथकाने सोमवारी (ता. ६) सुखरूप बाहेर काढले. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी या बचाव कार्यात मोलाची मदत केली.
येथील आरुवस्ती परिसरातील एका इमारतीच्या तळमजल्यावरील खोल्यांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांची मोठी तारांबळ उडाली. जीव वाचवण्यासाठी अनेक नागरिक वरच्या मजल्यावर आश्रयाला गेले होते. घटनेची माहिती मिळताच ‘एनडीआरएफ’चे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक, पोलिस पाटील, तलाठी आणि पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने पथकाने अडकलेल्या सर्व ६५ जणांना सुरक्षित स्थळी हलवले. प्रशासनाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली असून परिसरात अद्याप खबरदारी घेतली जात आहे.
आगरवाडीतील बंगल्यात अडकलेल्या पाच जणांना पाण्याबाहेर काढले सुखरूप
चाकण - खेड तालुक्यातील चाकण-राक्षेवाडी मार्गावर आगरवाडी येथे एका बंगल्यात अडकलेल्या पाच जणांना स्थानिक नागरिकांनी पाण्याबाहेर सुखरूप काढले. पहाटे चारपासून घरात पाणी शिरत होते घरातील नागरिकांनी पाणी बाहेर काढले, त्यानंतर पुन्हा सकाळी घरात दीड फुटावर पाणी आले व बाहेर तीन ते चार फुटावर पाणी साचले. सकाळी साडेदहाच्या सुमारास अगदी पाच फुटावर पाणी आले, त्यामुळे बंगल्यातील नागरिकांनी ग्रामस्थांना माहिती दिली. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी घरात अडकलेल्या पाच जणांना सुखरूप बाहेर काढले.
शंकर जाधव व त्यांचे कुटुंब घरात अडकले होते. ओढ्याला पूर आल्याने व पुलातून पाणी मोठ्या प्रमाणात पुढे जात नसल्याने ते पाणी त्यांच्या बंगल्या भोवती व परिसरात मोठ्या प्रमाणात साचले होते. या पुलाची एकतर उंची वाढवावी तसेच पुलाला दोन नळ्या अधिक टाकाव्यात असे सामाजिक कार्यकर्ते अंकुश आगरकर यांनी सांगितले.