Pawana Dam Water : अवघ्या ३३ तासांत तीन महिन्यांचा पाणीसाठा; वडगाव मावळसह पिंपरी चिंचवडला दिलासा
esakal July 07, 2026 03:45 AM

पिंपरी - पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी (ता. ५) सकाळी आठ ते सोमवारी (ता. ६) सायंकाळी पाच या अवघ्या ३३ तासांत शहराला सध्याच्या वितरण नियोजनानुसार ८९ दिवस अर्थात तीन महिने पुरेल इतका उपयुक्त पाणीसाठा वाढला आहे.

पिंपरी चिंचवडला पवना आणि आंद्रा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी सरकारकडून दोन्ही धरणांतून कोटा मंजूर आहे. सर्वांना पुरेसे, योग्य दाबाने व समन्याय वितरण पद्धतीने पाणी मिळावे, यासाठी २५ नोव्हेंबर २०१९ पासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. त्यानुसार पवना धरणातून दैनंदिन ५३० दशलक्ष लिटर आणि आंद्रातून शंभर दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी मिळणे अपेक्षित आहे. मात्र, तेवढे मिळत नसल्याने आणि पाण्याची मागणी अधिक असल्याने पवनातून अधिकचे शंभर आणि एमआयडीसीतून ३० एमएलडी पाणी घेतले जात आहे.

दररोज ७७० एमएलडी पाण्याची शहराला गरज आहे. मात्र, धरणातील कमी साठा आणि लांबलेला पावसाळा यामुळे गेल्या १५ दिवसांपासून महापालिकेने पाणीकपात सुरू केली आहे. त्यामुळे ७७० ऐवजी ५६५ एमएलडी पाणी घेतले जात आहे. शिवाय, पाणी वितरणाच्या वेळेतही कपात केली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी महापालिकेने पाणी वितरणाचे नियोजन केले आहे.

कारण, शुक्रवारी (ता. ३) सायंकाळी पाच वाजेपर्यंत पवना धरणात केवळ ४५ ते ५० दिवस पाणी पुरेल इतकाच साठा होता. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाने चांगलाच दिलासा दिला आहे. कारण, सोमवारी (ता. ६) सायंकाळी पाच वाजेपर्यंत साधारण तीन महिने पुरेल इतका पाणीसाठा झाला आहे.

असा झाला पाऊस (स्रोत ः जलसंपदा विभाग)

तारीख, वार, वेळ / उपयुक्त साठा (दशलक्ष घनमीटर)/ टक्केवारी

५ जुलै, रविवार, सकाळी ८ / ५७.६०/ २३.९०

६ जुलै, सोमवार, सायंकाळी ५ / ११७.४८/ ४८.७५

३३ तासांत वाढ / ५९.८८/ २४.८५

असे आहे गणित

रविवारी सकाळी आठ वाजता ५७,६०० दशलक्ष लिटर पाणीसाठा होता

सोमवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत १,१७,४८० दशलक्ष लिटर पाणीसाठा

पिंपरी चिंचवडसाठी दिवसाला ७७० दशलक्ष लिटर पाण्याची गरज

पिंपरी चिंचवडसाठी सध्या दिवसाला ५६५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा

३३ तासांत ५९,८८० दशलक्ष लिटर उपयुक्त पाणीसाठा झाला

३३ तासांत साधारण ८९ दिवस पुरेल इतका पाणीसाठा झाला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.