उदगीर, (जि. लातुर) - लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन असताना एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तसेच जातीवाचक अपमान, धमकी व फसवणूक केल्याच्या आरोपावरून उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ वर्षीय फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून तुकाराम लक्ष्मण बनसे (वय-३१), ज्ञानेश्वर लक्ष्मण बनसे आणि मिनाक्षी ज्ञानेश्वर बनसे (सर्व रा. आजनी, ता. देवणी, जि. लातूर) यांच्याविरुद्ध अत्याचार, पोक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, सन २०२१ पासून डिसेंबर २०२५ या कालावधीत उदगीर शहरातील उड्डाण पुलाखालील परिसर, बिदर गेटजवळील विविध ठिकाणे तसेच शहरातील शिवनंदा लॉज, शितल लॉज आणि विसावा लॉज येथे आरोपीने फिर्यादी अल्पवयीन असल्याचे माहिती असतानाही लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
यानंतर लग्न करण्यास नकार देत, "तू आदिवासी महादेव कोळी समाजातील असून नीच जातीची आहेस, त्यामुळे तुला पत्नीचा दर्जा देऊ शकत नाही आणि घरीही नेऊ शकत नाही," असे सांगून तिचा मानसिक छळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच तिचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार अत्याचार केल्याचेही फिर्यादीने नमूद केले आहे.
आरोपी ज्ञानेश्वर बनसे याने फिर्यादीला 'तुझी मालमत्ता माझ्या नावावर केली तरच तुला माझ्या भावाची पत्नी म्हणून घरात प्रवेश मिळेल,' अशी धमकी दिली. तर मिनाक्षी ज्ञानेश्वर बनसे हिनेही या कृत्यास प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.