गुरुदेव श्री श्री रविशंकर
आपण मानव हे पर्यावरणाचाच एक भाग आहोत. पर्यावरण म्हणजे केवळ झाडे, वनस्पती, पर्वत किंवा नद्या नव्हेत... एकमेकांची काळजी घेणे आणि सर्व जण आनंदी राहतील याची काळजी घेणे, हादेखील पर्यावरणाचाच एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्हालाही असे वाटते का?
आपण तणावग्रस्त किंवा क्रोधग्रस्त असतो, तेव्हा आपण सूक्ष्म पातळीवर पर्यावरण प्रदूषित करत असतो. एखाद्या रागीट किंवा नकारात्मक विचारांच्या व्यक्तीसोबत फक्त दहा मिनिटे बसलात, तरी त्याच्या निराशेचा किंवा अस्वस्थतेचा थोडासा प्रभाव तुमच्यावर पडतो. त्याचप्रमाणे, तुम्ही आनंदी लोकांबरोबर - विशेषतः लहान मुलांबरोबर - थोडा जरी वेळ राहाल, तर त्यांचा आनंद तुमच्याही मनात उतरतो.
आपण एकमेकांवर आपल्या ऊर्जेद्वारे नक्कीच प्रभाव टाकत असतो. प्रत्येक व्यक्तीकडून काही सूक्ष्म स्पंदने उत्सर्जित होत असतात. जेव्हा आपण तणावग्रस्त, रागावलेले, दुःखी किंवा निराश असतो, तेव्हा ही स्पंदने प्रदूषित असतात. म्हणूनच आपण नकारात्मक अवस्थेत असताना केवळ भौतिकच नव्हे, तर मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवरही पर्यावरण प्रदूषित करत असतो.
आपले मन इतके संवेदनशील असते, की ते इतरांच्या विचारलहरी आणि स्पंदने सहज ग्रहण करू शकते. आनंद म्हणजे आपल्या अंतरंगातून प्रकट होणारी शुद्ध, निर्मळ आणि अप्रदूषित स्पंदने. आनंद हा आपला खरा स्वभाव आहे. आपल्याला पुन्हा त्या नैसर्गिक आनंदाकडे परत जायचे आहे. पण ते कसे? सर्वप्रथम, आपल्याला तणावातून मुक्त व्हावे लागेल. एकमेकांविषयीचा अविश्वास दूर करून आपल्या जीवनात उत्सवाची भावना जागृत करावी लागेल. आपण शब्दांपेक्षा स्पंदनांद्वारे अधिक काही व्यक्त करत असतो.
आपली उपस्थिती आणि आपली स्पंदने शुद्ध करण्याचा सर्वांत प्रभावी मार्ग म्हणजे ध्यान. ध्यानामुळे नकारात्मकता सकारात्मकतेत रूपांतरित होते; द्वेषाचे प्रेमात, निराशेचे आत्मविश्वासात, हताशेचे आशेत आणि अज्ञानाचे अंतर्ज्ञानात रूपांतर होते. हे कौशल्य आत्मसात करायला तुम्हाला आवडणार नाही का?
आपली स्पंदने शुद्ध करण्याचा दुसरा मार्ग म्हणजे कला आणि संस्कृतीचा जीवनात सक्रिय सहभाग असणे. नृत्य, संगीत यामध्ये फक्त प्रेक्षक म्हणून न बसता, शंभर टक्के सहभाग घ्या. पावले योग्य पडतात की नाहीत, ती सुंदर दिसतात की नाहीत, याची चिंता करू नका. फक्त उत्स्फूर्तपणे सहभागी व्हा. तिसरा मार्ग म्हणजे गरजू लोकांपर्यंत पोहोचून त्यांची सेवा करणे. या तीन गोष्टी तुमच्या जीवनात मोठा बदल घडवतील.
नेहमी, ‘माझे काय? मला यातून काय मिळेल?’ असा विचार करू नका. त्याऐवजी, ‘मी काय करू शकतो? मी इतरांना कशी मदत करू शकतो? समाजासाठी माझे योगदान काय असू शकते?’ असा विचार करा.
अशा प्रकारचे संकल्प आणि भावना तुमची स्पंदने बदलू शकतात आणि तुम्हाला अधिक आनंदी, समाधानी आणि परिपूर्ण जीवन जगण्यास मदत करू शकतात.