Pune Rain News : राज्यात पावसाचा जोर कायम असून सर्वात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अशातच पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. सरलेल्या रात्रीत पडलेल्या पावसाने (Pune Rain) पुण्याला पावणेदोन महिने पुरेल इतकं पाणी धरणांमध्ये (Pune Water Storage) जमा झालंय. तर गेल्या चोवीस तासांत पडलेल्या पावसाने पुण्याला साडेतीन महिने पुरेल इतका पाणीसाठा पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत जमा झालाय.
दरम्यान, काल (6 जुलै) सकाळी सहा वाजता पुण्यातील खडकवासला धरसाखळीतील चार धरणांमध्ये मिळून 6.93 टी एम सी इतकं पाणी जमा झालं होतं. तर काल (6 जुलै) संध्याकाळी पाचपर्यंत त्यामध्ये वाढ होऊन ते 8.32 टीएमसी झालंय, तर आज पहाटे सहा वाजेपर्यंत ते 10.68 टी एम सी इतकं झालंय. या चार धरणांची पाणी साठविण्याची क्षमता 29 टी एम सी इतकी आहे. त्यामुळे आजच्या घडीला माध्यमांमध्ये 36.62 टक्के पाणी जमा झालंय. पुणे शहराला एका महिन्याला दिड टी एम सी इतकं पाणी लागतं
Pune Water Storage : उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून पाण्याची मोठी आवक; भीमा नदीचे पात्र तुडुंब
पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाट माथ्यावरती मुसळधार पाऊस होतोय त्यामुळे उजनी धरणात दौंड बंधाऱ्यातून पाण्याची मोठी आवक सुरू आहे.दौंड बंधाऱ्यामधून 1 लाख 45 हजार 561क्युसेकने भीमा नदीपात्रात पाण्याचा प्रवाह येत आहे. परिणामी भीमा नदीचे पात्र तुडुंब भरून वाहत आहे. गेल्या 48 तासात उजनी धरणात तब्बल सव्वाचार टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पाच जुलै रोजी वजा 27 पूर्णांक 96 टक्क्यावर असणारे उजनी धरण 48 तासानंतर उणे 20 पूर्णांक 21 टक्क्यावर आलं आहे. सध्या उजनी धरणात एकूण साठवण क्षमतेच्या 52 पूर्णांक 83 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.
Pune Rain News : पुण्यातील 101 शाळांना आठवडाभर सुट्टी जाहीर
सध्या पुणे शहरात पावसाची संततधार कायम आहे. परिणामी खडकवासला धरण 62 टक्के भरले असुन त्यातुन कधींही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या लोकांनी सावध राहण्याचा इशारा प्रशासनाने दिलाय. दुसरीकडे पुण्यातील 101 शाळांना आठवडाभर सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या शाळांमध्ये पुण्यात पालखीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
आळंदी आणि देहुत निर्माण झालेल्या पुर परिस्थितीमुळे वारकऱ्यांची राहण्याची सोय पुणे शहरातील पुणे महापालिकेच्या शाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या 101 शाळांना पुढचा आठवडाभर सुट्टी देण्यात आलीय. मात्र शहरातील महापालिकेच्या इतर शाळा आणि सर्व खाजगी शाळा या कालावधीत सुरू राहणार आहेत. पुणे महापालिकेच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी हा निर्णय घेतलाय.
Rain News : मुंबई-पुण्यात पावसाचा धुमाकूळ, धाराशिव तहानलेलाच; पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्या,
पुणे, मुंबईत पावसाचा अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळत आहे. मात्र दुसरीकडे धाराशिव तहानलेलाच आहे. धाराशिवमध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या पाच दिवसात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. पहिल्या पाच दिवसात अवघा सतरा मिमी पाऊस झाला आहे. तर गेल्या वर्षीच्या तुलनेने देखील पावसाचे प्रमाण कमी आहे. जून जुलै महिन्याचा विचार केला तर गेल्या वर्षी आतापर्यंत 259 मिमी पाऊस झाला होता. तर यंदा फक्त 150 मिमी पाऊस झाला असून दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाऊस दडी मारल्याने पेरण्या देखील खुळमले असून 70 टक्के क्षेत्रावरील अजून पेरणी झाली नाही. त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.