मुंबई-पुण्यात काल मुसळधार पाऊस कोसळला. या पावसामुळे वेगवेगळ्या दुर्घटना घडल्या. मुंबई-पुण्याला जोडणारा एक्सप्रेस वे, रेल्वे मार्ग काल पावसामुळे बंद झालेला. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर नुकताच उभारण्यात आलेला मिसिंग लिंकचा काही भाग कालच्या पावसात कोसळला. त्यावरुन राज्यातील विरोधी पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करत आहेत. आज खासदार संजय राऊत यांनी याच मुद्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. “दोन लोकांचं बिंग या देशात फुटलेलं आहे. एक विकास पुरुष नरेंद्र मोदी आणि दुसरे इन्फ्रा मॅन देवेंद्र फडणवीस. जे काय खड्डे पडेलत दोन खड्डे पडलेत. ६७०० कोटी काल एका झटक्यात वाहून गेले. कमिशन दलाली मिळाली ती वाहून गेली नाही. भाजपला निधी मिळाला त्यातून. पण सरकारचे पैसे वाहून गेले” अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली.
“ज्या ज्या गोष्टीइन्फ्रामॅननेसांगितल्या, त्याचा कसा बोजवारा उडाला हे आपण गेल्या काही वर्षात पाहिलं. ज्या पद्धतीने मुंबई, पुणे, ठाणे ही मोठी शहरं भाजपच्या ताब्यात आहेत. पावसामुळे या शहरांची जी वाताहात झाली. सगळ इन्फ्रास्ट्रक्चर वाहून गेलं, किती तकलादू पद्धतीने ठेकेदारांनी कामं केली. ठेकेदारांकडून यांच्या लोकांनी फक्त कमिशन घेतलं. २५ वर्ष शिवसेनेने सत्ता भोगली म्हणजे लोकांनी सत्ता आम्हाला दिली. आम्ही ती सत्ता चोरमार्गाने मिळवली नाही. लोकांनी आम्हाला मतदान केलं. फक्त भाजपचं सरकार आल्यापासून महापालिकेत प्रत्येक ठिकाणी फक्त ओरबाडणं सुरु आहे” असा आरोप संजय राऊत यांनी केला.
संकटमोचन नाही, संकटलोचन आहते ते
“आता लोकांना भिती वाटतेय नाशिक कुंभमेळ्याची. नाशिक कुंभमेळ्याची जबाबदारी कोणावर आहे, इन्फ्रा मॅनचा राइट हँड मॅन, जो या महाराष्ट्रतील सर्वात भ्रष्ट मंत्री आहे. संकटमोचन नाही, संकटलोचन आहते ते. कुंभ मेळ्यात किती भ्रष्टाचार होईल. लाखो लोकं तिथे येतील देशभरातून. सगळे ठेके हे गुजरातच्या ठेकेदारांना दिलेत. त्यामुळे अजिबात काम होणार नाही” असा दावा संजय राऊत यांनी केला.
शेवटचं टोक म्हणजे मिसिंग लिंक कोसळण
“मिसिंग लिंक कोसळताना जगाने पाहिले. सहादेश त्यांच्या सहकार्यातून मिसिंग लिंक तयार झाला. त्यातून स्वत: इन्फ्रा मॅन आणि त्यांची टीम फिरत होती. काय कस झालं. महाराष्ट्राची गेल्या काही वर्षात अप्रतिष्ठा, बेअब्रू झाली त्याचं शेवटचं टोक म्हणजे मिसिंग लिंक कोसळण आहे” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.
महाशय महाराष्ट्रात शिवसेना-भाजपं युतीचं सरकार असताना..
“मुंबईत ५६ पूल आम्ही उभारले. ज्यांनी एकापुलाची उभारणी केली नाही ते आम्हाला शिकवतायत असं ते म्हणाले. महाशय महाराष्ट्रात शिवसेना-भाजपं युतीचं सरकार असताना मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पासून ते ५६ पूल हे त्याचं काळात झाले. त्यावेळी आपण आमदार होता. तुम्ही विकास काय असतो हे सांगू नका” असं संजय राऊत म्हणाले.