Nashik Rain: वातावरण फिरलं! नाशिकवरील ढगफुटीचं संकट टळलं? आता या भागावर अतिवृष्टीची भीती? नवीन अपडेट काय?
Tv9 Marathi July 07, 2026 02:45 PM

मुंबई, पुण्यानंतर नाशिकमध्ये मुसळधार पावसाचे संकट ओढवलं आहे. हवामान खात्याच्या ढगफुटीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली आहे. गोदावरी नदीच्या परिसरातील टपऱ्या, दुकाने हटवण्यात आली आहे. मागील काही तासांपासून नाशिकच्या काही भागांत जोरदार पाऊस सुरू आहे. पालघरमध्ये पूरस्थिती निर्माण करणारा भोवरा नाशिकमध्ये सरकेल, असे भाकीत वर्तवण्यात आलं होतं. परंतु हा भोवरा वेगळ्याच दिशेने वळलाय, त्यामुळे नाशिकवरील अतिवृष्टीचं संकट टळण्याची शक्यता आहे.

पालघरमध्ये काल 450 मिमी पाऊस पडला. त्यानंतर हा भोवरा त्र्यंबकेश्वर–नाशिक मार्गे जाण्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर हा भोवरा उत्तर दिशेला सुरतला आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगरमधील अकोले परिसरात सरकल्याचे दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे बोलले जात आहे.

ढगफुटीचा धोका टळला?

पावसाचा भोवरा दुसरीकडे सरकल्याने नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचा धोका काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. पालघरहून इगतपुरी, त्र्यंबकेश्वरच्या दिशेने वाहून येणारे ढग गुजरातच्या सुरत आणि अहिल्यानगरमधील अकोलेच्या दिशेने सरकतंय, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. परंतु नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर भागात मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

नाशिक जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आज किती पाऊस पडला? (in MM)

कळवण-40
नांदगाव-1
सटाणा बालगण-47
निफाड-45.2
सुरगणा-149
सिन्नर-74
येवला-15
दिंडोरी-58
पेठ-61
इगतपुरी-200
पिंपळगाव बसवंत-51.5
देवळा-40
त्र्यंबकेश्वर -125

नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात पाणीसाठा वाढला

ढगफुटीच्या संकटादरम्यान नाशिकमध्ये धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. काल रात्रीपासून धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 37% भरलं आहे. तर दारणा धरणातील पाणीसाठा 21% वर पोहोचले आहे. भावली धरण 56% क्षमतेपर्यंत भरले आहे. जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा 28% वर पोहोचलाय. सततच्या पावसामुळे धरण क्षेत्रातील परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.