प्राथमिक माहितीनुसार, “AL JAFZIA” नावाचे हे कार्गो जहाज जोरदार पाऊस, उंच लाटा आणि वेगवान वाऱ्यांमुळे मार्ग भरकटून गोराई-मनोरी किनाऱ्याच्या दिशेने आले आणि खडकांमध्ये अडकले. गेल्या दोन दिवसांपासून जहाज तेथेच अडकून असून, त्यावर कोणतीही हालचाल दिसून आलेली नाही. जहाजात किती कर्मचारी आहेत किंवा तेथे कोणी उपस्थित आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच गोराई पोलीस, भारतीय तटरक्षक दल आणि इतर संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, खराब हवामान, मुसळधार पाऊस आणि वेगवान वाऱ्यांमुळे जहाजापर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. सध्या भारतीय तटरक्षक दलाच्या देखरेखीखाली जहाजावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, मनोरी परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय तटरक्षक दलाने येलो गेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार गु.र.क्र. ६०/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८७, ३(५), ६१, ३१८, ३३६, ३४० तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.