CM Devendra Fadnavis | दिल्लीकडे मुख्यमंत्री फडणवीसांची धाव!; मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांदरम्यान महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हालचाली?
Tv9 Marathi July 07, 2026 02:45 PM

राज्यातील राजकारणात सध्या वेगवान घडामोडी घडत असून, शिवसेना (ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र होताना दिसत आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी बंडखोरी करत शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पक्षातील अस्वस्थता वाढली आहे. त्यातच पक्षातील एका आमदाराची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाल्याने ठाकरे गटाला आणखी एक राजकीय धक्का बसल्याची चर्चा आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवारी) सायंकाळी ७ वाजता राज्यातील सर्व आमदारांची तातडीची बैठक बोलावली आहे. पक्षातील सध्याच्या राजकीय परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील रणनीती निश्चित करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. तसेच ठाकरे गटातील आणखी काही आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांमुळे राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

दरम्यान, दिल्लीतही महत्त्वाच्या राजकीय हालचाली सुरू असून, लवकरच केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ठाकरे गटातून शिंदे गटात दाखल झालेल्या सहा खासदारांपैकी दोघांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. याशिवाय खासदार श्रीकांत शिंदे यांच्याही नावाची चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. अधिकृत कार्यक्रमासाठी ते दिल्लीत असले तरी संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या अनुषंगाने त्यांच्या भेटीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मागील काही दिवसांत शिंदे गटाने ठाकरे गटाला सलग राजकीय धक्के दिल्याची चर्चा सुरू आहे. सहा खासदारांच्या बंडानंतर सचिन आहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी निवड झाल्याने राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत असल्याचे चित्र दिसत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.