Water Bottle Expiry Date: प्रवासात असताना आपण आपसूक पाण्याची बाटली दुकानातून खरेदी करतो. कारण पाण्याशिवाय जगूच शकत नाही. त्यामुळे पाण्याची बाटली घेतली गटागटा पाणी प्यायलं जातं. पण तुम्ही कधी पाहिलं आहे का? पाण्याच्या बाटलीवरही एक्सपायरी डेट लिहिलेली असते. काही जणांच्या मते काही दिवसानंतर बाटलीतलं पाणी खराब होतं. त्यामुळे अनेक जण एक्सपायरी डेट पाहून आपण दूषित पाणी तर प्यायलो नाही ना असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही. पण पाण्याच्या बाटलीवर लिहिलेली एक्सपायरी डेट ही पाण्याची नाही तर त्या प्लास्टिक बाटलीशी असते. नेमकं कसं काय ते सर्व समजून घेऊयात..
सीलबंद पाण्याच्या बाटल्यांवर छापलेली एक्सपायरी डेट ही पाण्याची नसून पीईटी प्लास्टिक बाटलीची असते. पाणी शुद्ध राहिलं आणि सीलही शाबूत असेल तर ते नैसर्गिकरित्या कालबाह्य होणार नाही. पण पीईटी प्लास्टिक जुनं झाल्यावर त्याचं विघटन होऊ शकते. साठवणुकीच्या उच्च तापमानात दीर्घकाळ संपर्कात आल्यानं तसं होऊ शकते. या प्रक्रियेत बीपीए आणि अँटिमनीसारखी काही रसायनं पाण्यात सोडली जाऊ शकतात. पाणी सुरक्षित असलं तरी दीर्घकाळ साठवून ठेवल्यास किंवा अति उष्णतेच्या संपर्कात आल्यास त्या पाण्याला प्लास्टिकसारखी चव किंवा वास येऊ शकतो. हा बदल पाण्यामुळे नाही तर बाटलीच्या स्थितीमुळे होतो. एक्सपायरी डेट संपलेल्या बाटलीतून पाणी प्यायल्यास तुम्हाला पचनसंस्थेच्या विकारांना सामोरे जावे लागू शकते.
प्लास्टिकचे विघटन सुरू झाल्यानंतर बाहेरील दुर्गंधी आणि सूक्ष्मजीवांना बाटलीत प्रवेश करणं सोपं होतं. त्यामुळे असं पाणी पिणं योग्य ठरणार नाही. त्यामुळे एक्सपायरी डेट ही पाण्याच्या नैसर्गिक गुणवत्तेशी नसून पॅकेजिंगशी असते. पाणी बाटलीबंद असताना त्याच्यावर एक्सपायरी डेट छापण्याची प्रथा 1987 मध्ये न्यू जर्सीने एक कायदा लागू केल्यावर सुरू झाली. या कायद्याप्रमाणे बाटलीबंद पाण्यासह अन्न आणि इतर पेयांवर एक्सपायरी डेट छापणं अनिवार्य आहे. त्यामुळे उत्पादकांनी सर्व पाण्याच्या बाटलीबंद पॅकेजिंगवर एक्सपायरी डेट छापण्यास सुरूवात केली. सर्वसामान्यपणे प्लास्टिकच्या बाटलीतील पाण्याची एक्सपायरी डेट 2 वर्षापर्यंत असू शकते.