Raigad Heavy Rain : पाऊस आला धावून, अन् रस्ते गेले वाहून; रायगड जिल्ह्यात रस्ते व महामार्गांची दूरवस्था प्रवाशांचा जीव धोक्यात
esakal July 08, 2026 01:45 AM

पाली - मागील पाच-सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण रायगड जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रमुख रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

सुरुवातीला मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, पुणे-बेंगलोर महामार्ग आणि पाली-खोपोली राज्य महामार्ग यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साठल्यामुळे हे मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले होते. सोमवारी (ता. 6) रात्री पावसाने थोडी उसंत घेतल्याने रस्त्यांवरील पाणी ओसरले असले, तरी त्यानंतर समोर आलेले चित्र अत्यंत विदारक आणि धक्कादायक आहे.

पाणी ओसरल्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांचे खरे रूप समोर आले आहे. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवरील डांबराचे थरच्या थर उखडून निघाले असून जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. तर काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. अनेक ठिकाणी तर रस्त्यांना आणि पुलांना मोठी भगदाडे पडली आहेत.

पाली-खोपोली राज्य महामार्गावरील पाली येथील अंबा नदीच्या पुलापुढील रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडले असून या मार्गाची दुरवस्था झाली आहे. याशिवाय नागोठणे शहरातील अंतर्गत रस्ते आणि रेवदंडा-अलिबाग रस्ता देखील उध्वस्त झाला आहे. तर रोहा तळेखार सुपेगाव मार्गे मुरूड रस्ता खचल्याने वाहतूक बंद आहे. मुंबई-गोवा महामार्गाचीही अशीच दुरवस्था झाली असून वाहनचालकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे.

भिसे खिंडीत वारंवार दरड कोसळल्याने तेथील रस्त्याची देखील दुरवस्था झाली आहे. मुसळधार पावसामुळे अशाच प्रकारे रायगड जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने या मार्गांची तात्पुरती दुरुस्ती करावी, अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

अलिबाग-रोहा मार्गावरील खानाव गावच्या हद्दीत असलेल्या एका पुलाला मोठे भगदाड पडले आहे. ऐन पावसाळ्यात पुलाची अशी अवस्था झाल्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. विशेष म्हणजे यापूर्वी याच पुलाच्या दुरुस्तीवर प्रशासनाने लाखो रुपयांचा खर्च केला होता. एवढा मोठा खर्च करूनही पहिल्याच मोठ्या पावसात पुलाला भगदाड पडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर आणि त्यांच्या ऑडिटवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अलिबाग-रेवदंडा मार्गासह जिल्ह्यातील इतर मुख्य रस्त्यांची मुसळधार पावसामुळे अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि पुलांना पडलेली भगदाडे यामुळे अपघातांना निमंत्रण मिळणार आहे. प्रशासनाचा हा ढिसाळ कारभार आणि निष्काळजीपणा थेट प्रवाशांच्या जीवावर बेतत आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या दोषी ठेकेदारांवर तातडीने गुन्हे दाखल झाले पाहिजेत.

- ॲड. राकेश पाटील, अलिबाग

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.