Vasai Virar Local Stop : पावसापुढे रेल्वेची पुन्हा शरणागती; १२ तासांत दुसऱ्यांदा वसई-विरार लोकल ठप्प! लाखो प्रवासी अडकले
esakal July 08, 2026 01:45 AM

- नितीन बिनेकर

मुंबई - मुसळधार पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही पश्चिम रेल्वेची दाणादाण उडवली. सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून बंद असलेली वसई रोड-विरार लोकल सेवा मंगळवारी पहाटे ३.५७ वाजता विरारहून चर्चगेटकडे पहिली लोकल सोडून सुरू करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला होता.

मात्र, हा दिलासा अवघा १२ तासच टिकला. दुपारी ४.१५ वाजता पावसाचा जोर पुन्हा वाढताच रुळांवरील पाण्याची पातळी धोक्याच्या मर्यादेपर्यंत पोहोचली आणि वसई रोड-विरारदरम्यानची लोकल सेवा पुन्हा बंद करण्यात आली. त्यामुळे संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत हजारो नव्हे तर लाखो प्रवाशांचा प्रवास अक्षरशः ठप्प झाला.

रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने मंगळवारीही उसंत घेतली नाही. मुंबई, उपनगर आणि पालघर जिल्ह्यात दिवसभर सरी कोसळत राहिल्या. वसई, नालासोपारा आणि विरार परिसरातील सखल भाग जलमय झाले. अनेक ठिकाणी रेल्वे रुळ पाण्याखाली गेल्याने पश्चिम रेल्वेला पुन्हा एकदा लोकल सेवा थांबविण्याचा निर्णय घ्यावा लागला.

पहाटे सुरू... दुपारी पुन्हा बंद

पहाटे सेवा सुरू झाल्यानंतर ४ ते ५ लोकल फेऱ्या चालविण्यात आल्या. रखडलेल्या अनेक मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांनाही मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आले. मात्र दुपारनंतर परिस्थिती झपाट्याने बदलली. पावसाचा जोर वाढताच रुळांवरील पाण्याची पातळी वाढू लागली आणि दुपारी ४.१५ वाजता वसई रोड-विरार लोकल सेवा पुन्हा स्थगित करण्यात आली. सलग दुसऱ्या दिवशी लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचा संयम सुटल्याचे चित्र स्थानकांवर दिसत होते.

चर्चगेट ते डहाणू रोड थेट सेवा बंद

वसई रोड-विरार मार्ग बंद झाल्याने चर्चगेट ते डहाणू रोड या मार्गावरील थेट लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली. चर्चगेट ते वसई रोडदरम्यानच लोकल सेवा सुरू ठेवण्यात आली. मात्र या लोकलही २० ते २५ मिनिटांच्या विलंबाने धावत होत्या. जलद लोकलना अर्धा तास, तर धीम्या लोकलना १५ ते २० मिनिटांचा अतिरिक्त वेळ लागत होता. परिणामी प्रत्येक स्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली.

मेल-एक्स्प्रेसचाही वेग मंदावला

सुरुवातीला जलद मार्गावरून मेल आणि एक्स्प्रेस गाड्या चालविण्यात आल्या. मात्र पावसाचा जोर कायम राहिल्याने या गाड्यांच्याही वाहतुकीवर परिणाम झाला. अनेक गाड्या नियंत्रित वेगाने धावल्या.

लोकल तिकिटावर मेल-एक्स्प्रेसने प्रवासाची मुभा

वसई रोड-विरारदरम्यान लोकल सेवा बंद झाल्याने पश्चिम रेल्वेने लोकलचे वैध तिकीट किंवा मासिक पास असलेल्या प्रवाशांना मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांतून प्रवास करण्याची विशेष परवानगी दिली. तरीही मर्यादित गाड्या आणि प्रचंड गर्दीमुळे अनेकांना या सुविधेचाही लाभ घेता आला नाही.

संध्याकाळी एकाच मार्गावर सेवा

रुळांवरील पाणी काहीसे ओसरल्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता डाऊन धीम्या मार्गावरून लोकल सेवा सुरू करण्यात आली. मात्र अप धीमा आणि जलद मार्ग रात्री लोकलं सेवेसाठी बंदच होते. त्यामुळे विरार, नालासोपारा आणि वसई परिसरातील प्रवाशांना दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली.

रात्रीपर्यंत अनिश्चितता कायम

रात्री उशिरापर्यंत अप धीमा आणि जलद मार्गावरील लोकल सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत होते. मात्र पाऊस सुरूच असल्याने सेवा पूर्णपणे पूर्ववत कधी होणार, याबाबत कोणतीही निश्चितता नव्हती. सलग दोन दिवसांच्या या गोंधळामुळे पश्चिम रेल्वेवरील लाखो प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.