Nagpur Crime : 'एआय' तंत्रज्ञानाने शोधला निर्घृण मारेकरी; वृद्धेवरील अत्याचार व खुनाचा झाला उलगडा
esakal July 08, 2026 01:45 AM

नागपूर - ग्रामीण पोलिसांनी पाटणसावंगी परिसरातील भटक्या अज्ञात वृद्धेवरील अत्याचार आणि निर्घृण हत्येचा उलगडा केला आहे. ‘एआय’ तंत्रज्ञान, सीसीटीव्ही आणि चिप्सच्या पाकिटाच्या तुकड्यावरून आरोपी सुधाकर दादाराव मंडपे (४८) याला अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.

पाटणसावंगी परिसरात नऊ दिवसांपूर्वी घडलेल्या भटक्या अज्ञात वृद्ध महिलेच्या अनैसर्गिक अत्याचारानंतर झालेल्या निर्घृण हत्येने परिसरात खळबळ माजली होती. पोद्दार यांनी सांगितले की, २७ जून रोजी दुपारी ही घटना घडली होती. पावसामुळे आणि उष्णतेमुळे मृतदेहाची अवस्था अत्यंत खराब झाल्याने ओळख पटविणे कठीण झाले होते. पोलिसांनी एआय आधारित ‘मार्व्हल’ प्रणालीचा वापर करून मृत महिलेच्या चेहऱ्याच्या रचनेवर आधारित चार संभाव्य प्रतिमा तयार केल्या.

या प्रतिमांच्या आधारे परिसरात चौकशी करण्यात आली असता खापरखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते विनोद भिंगारे यांनी संबंधित महिला काही दिवसांपूर्वी दहेगाव बसस्थानक परिसरात दिसल्याची माहिती दिली. त्यांनी ती माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बन्सोड यांना पाठविलेल्या छायाचित्राशी पडताळून पाहिली असता एआय प्रतिमा आणि मूळ छायाचित्रात सुमारे ८५ टक्के साम्य आढळले.

त्यानंतर दहेगाव बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामध्ये संबंधित महिला एका बस एजन्सीच्या कार्यालयात दिसली. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्या मागोमाग लाल शर्ट परिधान केलेला एक व्यक्ती आला आणि काही वेळ बोलल्यानंतर तिला दुचाकीवर बसवून घेऊन गेल्याची माहिती दिली. त्या फुटेजच्या आधारे एआयने संशयिताची प्रतिमा तयार केली. ती प्रतिमा आणि आरोपी मंडपे याच्या चेहऱ्यातही सुमारे ८५ टक्के साम्य आढळले.

चिप्सच्या पाकिटामुळे तपासात मदत

पिवळ्या रंगाच्या चिप्सच्या पाकिटाचा वरचा तुकडा घटनास्थळी पोलिसांना मिळाला. संबंधित कंपनीच्या वितरकाकडे चौकशी केली असता असे पाकीट केवळ पाटणसावंगी-खापरखेडा मार्गावरील आठ दुकानांमध्येच विकले जात असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे आरोपीने वृद्धेला कोणत्या मार्गाने घटनास्थळी आणले असावे, याचा पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाला. एआयने तयार केलेली प्रतिमा पाहून एका व्यक्तीने संशयिताची ओळख सुधाकर मंडपे अशी सांगितली. तो त्याच्या मुलीकडे बोखारा येथे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

१० ते १५ किमी रेंजवरील मोबाईलचे विश्लेषण

घटनास्थळापासून १० ते १५ किलोमीटर परिसरातील तब्बल ५२ हजार सक्रिय मोबाईल क्रमांकांचे विश्लेषण करण्यात आले. त्यापैकी पाच हजार संशयित क्रमांकांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले. मात्र आरोपी मोबाईल वापरत नसल्याने तपास अधिक गुंतागुंतीचा ठरल्याचे पोलिस अधीक्षक पोद्दार यांनी सांगितले. प्राथमिक तपासात आरोपीविरुद्ध २००५ मध्ये अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंद असल्याचे समोर आले आहे.

तसेच २०१८ मध्ये सावनेर पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला होता. या पार्श्वभूमीवर त्याने यापूर्वीही अशा स्वरूपाचे गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांकडून तपासली जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के आणि तपास अधिकारी सागर खर्डे यांनी केला. मृत महिलेची ओळख पटविण्याचे प्रयत्न अद्याप सुरू आहेत. न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.