Hadapsar News : पालिकेचा हलगर्जीपणा, विद्यार्थ्यांची घाण पाण्यातून कसरत
esakal July 08, 2026 09:45 PM

हडपसर - काळे-बोराटेनगर परिसरातील चेंबरची नियमित साफसफाई होत नसल्याने येथील जोगेश्वरी कॉलनीमध्ये पावसानंतर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहत आहे. त्यामुळे येथे असलेल्या शाळेत जाताना विद्यार्थ्यांना थेट घाण पाण्यातून कसरत करीत प्रवास करावा लागत आहे.

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे परिसरातील चेंबरची नियमित साफसफाई न झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत आहे. शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. या पाण्यातूनच त्यांना मार्ग काढावा लागत आहे. साचलेल्या पाण्यात सांडपाणी मिसळल्याने दुर्गंधी पसरत असून विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. या पाण्यातून दररोज ये-जा करणाऱ्या मुलांना त्वचेचे विकार, खाज आणि अॅलर्जीचा त्रास होत असल्याची माहिती पालकांनी दिली आहे.

वारंवार तक्रारी करूनही महापालिकेकडून चेंबरची साफसफाई किंवा पाण्याच्या निचऱ्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने चेंबरची साफसफाई करून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

दरम्यान याबाबत कोंढवा उंड्री क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त सुचिता पानसरे म्हणाल्या, 'तेथील परिस्थितीची माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजना कातडीने करण्यात येतील.'

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.