Goa Vitthal Rukmini Bhavan: गोवा ते पंढरपूर वारी अधिक सोयीची होणार! वारकऱ्यांसाठी हक्काचे 'गोवा भवन' उभारणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा
esakal July 09, 2026 01:45 AM

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंढरपूरमध्ये गोमंतकीय वारकऱ्यांसाठी स्वतंत्र 'गोवा विठ्ठल-रुक्मिणी भवन' उभारण्यात येणार असून, त्यासाठी जागा निश्चित करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. पंढरपूर आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकऱ्यांना शुभेच्छा देत असताना मुख्यमंत्र्यांनी हि माहिती दिली.

गोव्यातून दरवर्षी हजारो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपूरला जातात. मात्र, वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी मुक्कामी सुविधा आजवर उपलब्ध नव्हती. हि समस्या लक्षात घेत मागील वर्षी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा भवन उभारण्याची घोषणा केली. याच घोषणेला मूर्त रूप देत यावर्षी गोवा भवनासाठी जमीन निश्चित करण्यात आली आहे. यामुळे आता वारकऱ्यांना पंढरपूरमध्ये सुरक्षित, सुसज्ज आणि हक्काचे निवासस्थान उपलब्ध होणार आहे.

CM Vijay: तमिळनाडू राज्य सरकारचा मोठा निर्णय! दारू विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चांदी; मात्र दारूप्रेमींना बसणार मोठा झटका?

पुढील वर्षीच्या आषाढी एकादशीपूर्वी हे भवन उभारण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी सांगितले. याचबरोबर, गोव्यातील नोंदणीकृत वारकरी दिंड्यांना प्रवासासाठी आर्थिक सहाय्य देण्याचीही घोषणा करण्यात आली आहे. यानुसार गोवा सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयामार्फत मुख्यमंत्रीडॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते ३६ नोंदणीकृत वारकरी दिंड्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्यात आले. दिंडीतील वारकऱ्यांच्या संख्येनुसार ₹१ लाख ते ₹५ लाखांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार असून, ही रक्कम नोंदणीकृत दिंडींना थेटपणे वितरित केली जाईल.

या योजनेअंतर्गत किमान 40 वारकरी असलेल्या नोंदणीकृत दिंड्यांना परतीच्या बसप्रवासासाठी आर्थिक सहाय्य तसेच इतर आवश्यक सुविधा दिल्या जाणार आहेत. या उपक्रमाअंतर्गत सुमारे 3,500 वारकऱ्यांची नोंदणी करण्यात आली असून, प्लास्टिकमुक्त वारीला प्रोत्साहन देण्यासाठी कापडी पिशव्या, पारंपरिक वारकरी वेशभूषा, औषधांचे संच (मेडिकल किट) तसेच वारीच्या मार्गावर निश्चित ठिकाणी वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

Kashi vishwanath : रांगेत न थांबता होणार बाबा विश्वनाथचे दर्शन; जाणून घ्या स्थानिक नागरिकांसाठी असणारी 'गेट ४बी'ची वेळ

यामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि पर्यावरणपूरक होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणांमुळे गोमंतकीय वारकऱ्यांची अनेक वर्षांपासूनच्या मागण्या पूर्ण होणार आहेत. त्यामुळे वारकरी संप्रदायाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून, यंदाची वारी गोमंतकीय वारकऱ्यांसाठी अधिक आनंददायी ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.