घरातील हिरवाई : आनंद आणि ऑक्सिजन
esakal July 09, 2026 11:45 AM

प्रा. डॉ. विलीना इनामदार

माझ्या घरातील बागेत कोण कोण येते? मुनिया येतात, नी शिंजीर येतात, टपटप दाणे टिपून जातात. बागेची हिरवाई, दाणे टिपणारे व मातीच्या सुगडातील थंडगार पाणी पिणारे पक्षी हे माझ्या बागेचे वैभवच!

बागेतल्या कढीपत्याच्या फक्कड फोडणीने माझी कढी, आमटी आणि सूप चविष्ट होतेच; पण त्याच्या लाल काळ्या फळांचे जेवण करायला येणारे बुलबुल जोडपे मेहुण जेवल्याचे समाधान आम्हाला देऊन जाते. नेमाने दिलेले पातळ ताक आणि मातीत खोचलेला हिंगाचा खडा त्याचे निरोगीपण जपतो.

शाखा, उपशाखांनी बहरलेला सोनचाफा ताम्हणभर फुले देतो, तेव्हा आसमंत आपल्या सुगंधित वासाने दरवळवून टाकतो. कढीपत्यावर आणि सोनचाफ्यावर येणारी फुलपाखरे निसर्ग परिसंस्थेला चार चाँद लावतात. कुंडीतील कागदी लिंबू बहरायला लागले, की पानांगणिक त्याच्या छोट्या छोट्या हिरव्या पाचूच्या लिंबकण्यांचा सोहळा मनाला आल्हाद देणारा असतो.

कुंडीत आपोआप आलेले वडाचे झाड मोठे झाले आहे. त्याच्या लांबच लांब पारंब्यांचा पसारा त्याच्याच एका फांदीला मी गुंडाळून ठेवला आहे, जागेच्या अभावी. त्याच्या लवलवत्या, लोभस मखमली पालवीचे देखणेपण मनमोहक असते यात शंकाच नाही. त्याच्या उंचीशी स्पर्धा करणारा ऑल स्पाईस दालचिनी, मिरे, लवंग, वेलची व तमालपात्राचा एकत्रित स्वाद माझ्या शाही पुलावाला वेगळीच चव देतो.

हिरव्याकंच पानांची देखणी आणि तेवढीच तरतरीत कर्दळ संकष्टीला लाल फुलांची हजेरी लावून श्रीच्या मुकुटवर विराजमान होतेच होते. फक्कड फोडणीचे झणझणीत पोहे कर्दळीच्या हिरव्या पानातून खाताना अगदी स्वर्गीय सुखाची अनुभूती देतात. मघईच्या विड्याच्या पानाची वेल आता गगनावरी सळसळ करायला लागलीये. जेवणानंतरचा मुखवास तिच्या कोवळ्या पानातून आमचे आरोग्य जपतो हे वेगळे सांगायलाच नको. सीताफळाने मागील वर्षी आपल्या अस्तित्वाची चाहूल भरभरून फळे देण्याने सिद्ध केलीय. त्यावर टांगलेल्या बर्ड फीडरवर येणाऱ्या मुनियांची लगबग एका दमात राळे फस्त करून जातात. प्रत्येक दाणा टिपताना फोलपट बाजूला टाकायचे, चिवचिवाट करत आम्हाला वर्दी द्यायची, इकडेतिकडे बघत कानोसा घ्यायचा आणि आमची चाहूल लागली, की भुर्रकन आकाशाला गवसणी घालायची हे क्षण खरोखरी मनाला गर्भश्रीमंत करतात हेच खरे. आता तर त्यांच्यात एक नवीन पाहुणा येऊ लागलाय तो म्हणजे खारुताई.

मोगरीच्या घमघमाटात मे महिना न्हाऊन निघतो. त्यासाठी त्याची छाटणी मी जानेवारीतच करते. पुढे पाणी तोडते आणि त्यानंतर नवीन पालवीचे नवोन्मेष, पानागणिक आलेल्या कळ्यांचे गर्भारलेपण आणि संध्याकाळच्या श्वासाला धुंद करणारा शुभ्र फुलांचा दरवळ हे सगळे वेड लावणारे सृजनाचे सोहळे.

माझ्या घरचे मनी प्लॅन्ट, रेनलीली, पिसलीली, सिंगोनिम, सोनटक्का, क्लो्रोफायटम, कोरफड, बेल, तुळस, आंबा, जांभूळ, अबोली अशी न संपणारी नावे अनेक; पण हिरवाईच्या सृजनाचा साक्षात्कार एकच आणि तोही डोळ्यांना नित्य सुखवणारा!

या कुंड्यांना स्वयंपाकघरातील भाजीपाल्याच्या साली तीन दिवस पाण्यात भिजवून त्या पाण्याचा खाऊ प्रत्येक कुंडीला ‘कंपोस्ट टी’ म्हणून निसर्गातील पुनर्वापराला प्रोत्साहन देतोच; पण बागेची हिरवाई वर्षभर टिकवतो. बाग आनंद देतेच; पण माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी पावलापुरता प्राणवायू निर्माण करण्यात मला स्वयंपूर्णही बनवते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.