Petrol-Diesel Rate : ज्याची होती भीती तेच घडतंय, अमेरिका-इराण तणावाने कच्च्या तेलाला 'आग'; भारतात..
Tv9 Marathi July 09, 2026 11:45 AM

Petrol-Diesel Rate Today on July 9 : अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्याने जागतिक तेलबाजारात बुधवारी मोठी खळबळ उडाली. कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सुमारे 6 टक्क्यांची वाढ झाली असून, त्यामुळे भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात होण्याच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला आहे. ब्रेंट क्रूड फ्युचर्सचा भाव 4.58 डॉलर (6.09 टक्के) वाढून 78.66 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट (WTI) क्रूड 4.22 डॉलर (6 टक्के) वाढीसह 74.65 डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होता. दोन्ही बेंचमार्कची 23 जूननंतरची ही सर्वोच्च पातळी आहे. मात्र यामुळे येत्या काळात इंधनाचे दर वाढण्याची शक्यता असून सर्वसमान्यांच्या खिशावर पुन्हा दरवाढीमुळे भार पडू शकतो.

भारतात 25 मेपासासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) अखेर पेट्रोलमध्ये प्रति लिटर 2.61 रुपये आणि डिझेलमध्ये प्रति लिटर 2.71 रुपये वाढ केली होती. सध्या दिल्लीमध्ये पेट्रोल 102.12 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 95.20 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर

शहर  पेट्रोलची किंमत (प्रती लिटर) डिझेलची किंमत (प्रती लिटर)
दिल्ली  102.12 रुपये 95.20 रुपये
मुंबई 111.21 रुपये 97.83 रुपये
कोलकाता 113.51 रुपये 99.82 रुपये
अहमदाबाद 101.70 रुपये 97.84 रुपये
चेन्नई 107.77 रुपये  99.55 रुपये
पाटणा 113.35 रुपये  99.36 रुपये
लेह 109.81 रुपये 97.92 रुपये
तिरुअनंतपुरम 115.49 रुपये 104.40 रुपये
पुणे 111.52 रुपये 98.15 रुपये

कच्चं तेल महागण्यामागचं कारण काय?

तुर्कीची राजधानी अंकारा येथे सुरू असलेल्या नाटो (NATO) शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतचा युद्धविराम (सीजफायर) संपुष्टात आल्याचे संकेत दिले. जूनमध्ये झालेल्या अमेरिका-इराण शांतता कराराचा उल्लेख करत त्यांनी, “इराणशी चर्चा करणे म्हणजे वेळेचा अपव्यय आहे,” अस वक्तव्य केलं. मात्र त्यांच्या या वक्तव्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीमार्गे (Strait of Hormuz) होणाऱ्या जागतिक तेलपुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात असून, त्याचाच परिणाम म्हणून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली.

भारतावर काय होणार परिणाम ?

भारत आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या गरजेपैकी सुमारे 85टक्के तेल हे आयात करतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास त्याचा थेट परिणाम देशातील तेल कंपन्यांच्या आयात खर्चावर होतो. तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमती या दीर्घकाळापर्यंत 80 डॉलर प्रति बॅरलच्या वर राहिल्या तर भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे सर्वसामान्यांच्या इंधन खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.