Amravati: सोयाबीनचं बियाणं निघालं बोगस, दुबार पेरणीची वेळ; शेतकरी संकटात
esakal July 09, 2026 03:45 PM

अमरावती: यंदाच्या खरीप हंगामात पेरणी केलेले सोयाबीनचे बियाणे उगवले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून समोर आली आहे. तिवसा, वरुड, मोर्शी, भातकुली, वलगाव आणि धामणगावरेल्वे तालुक्यातील शेतकऱ्यांनी या तक्रारी केल्या. त्यामुळे उत्पादक कंपनीविरुद्ध शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आली असल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल करून कारवाईची मागणी युवा स्वाभिमान पक्षाने विभागीय सहसंचालकांकडे निवेदन देत केली आहे.

जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ६५ टक्के जमिनीवर पेरणी झाली आहे. मात्र तिवसा, वरुड, मोर्शी, भातकुली, वलगाव आणि धामणगावरेल्वे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे सुमारे १४० रुपये प्रति किलो, या दराने खरेदी करून चालू हंगामात पेरणी केली.

Amravati: आठ दिवसांत वाढला धरणांतील जलसाठा; ५ दलघमीची वाढ, ४४ टक्के साठा, पूर्णामधून विसर्ग

मात्र पेरणीनंतर मोठ्या प्रमाणावर बियाण्यांची उगवण झाली नाही अथवा अत्यल्प प्रमाणात उगवण झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. बियाणे खरेदीचा खर्च, पेरणीसाठी केलेला मजुरीचा खर्च, मशागत, वेळ, श्रम तसेच इतर कृषी खर्च पूर्णपणे वाया गेले आहेत. परिणामी शेतकरी अत्यंत चिंताग्रस्त व आर्थिक संकटात सापडले आहेत.

Konkan Railway : CM फडणवीसांचं पत्र अन् राणेंचा दिल्लीत पाठपुरावा! सावंतवाडी टर्मिनसवर 'राजधानी'सह 3 महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर, रेल्वेमंत्र्यांनी काय केली घोषणा?

आता दुबार पेरणी करावी लागल्यास आवश्यक बियाणे उपलब्ध होईल की नाही, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये मोठी अनिश्चितता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट ओढवले आहे, अशी तक्रार युवा स्वाभिमान पक्षाने केली आहे. या पक्षाचे नेते सुनील राणा, प्रकाश साबळे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी विभागीय सहसंचालकांकडे निवेदन देत संबंधित बियाणे कंपन्यांची तातडीने चौकशी करून नुकसानभरपाईसाठी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.