Nanded Highway: नांदेड हादरले! १,००० कोटींच्या महामार्गावरील उड्डाणपुलाची संरक्षक भिंत कोसळली; दोन प्राध्यापिका थोडक्यात बचावल्या
esakal July 10, 2026 12:45 PM

नवीन नांदेड: सोनखेड ते वारंगा या एक हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या हायटेक महामार्गाच्या कामाचा दर्जा पुन्हा एकदा चर्चेत आला. विष्णुपुरी येथील एसजीजीएस अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील तुळजापूर-लातूर-नागपूर महामार्गावरील उड्डाणपुलाची सिमेंट ब्लॉक्सची संरक्षक भिंत गुरुवारी (ता. ९) दुपारी अचानक कोसळली. भिंतीचे शेकडो काँक्रीट ब्लॉक्स आणि आतील माती-खडीचा मोठा भराव थेट मुख्य रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली. दोन प्राध्यापिका थोडक्यात बचावल्या असून, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

विष्णुपुरी परिसर अत्यंत वर्दळीचा आहे. येथे डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासह अनेक शैक्षणिक संस्था आहेत. त्यामुळे या मार्गावर दिवसरात्र मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. गुरुवारी नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू असताना पुलाच्या बाजूला लावलेले पूर्वनिर्मित काँक्रीटचे इंटरलॉकिंग ब्लॉक्स आणि त्यामागील मातीचा भराव अचानक सरकला. काही क्षणांतच मोठ्या आवाजासह संरक्षक भिंतीचा मोठा भाग खाली रस्त्यावर कोसळला. या दुर्घटनेमुळे पुलाच्या भागात मोठे भगदाड पडले असून, रस्त्याचा काही भाग ढिगाऱ्याखाली गेला.

जेसीबीच्या सहाय्याने ढिगारा हटविण्याचे काम

घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीच्या सहाय्याने युद्धपातळीवर ढिगारा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले. या घटनेबाबत माहिती अधिक माहितीसाठी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.

का कोसळली भिंत?

अभियांत्रिकी तज्ज्ञांच्या मते, पूर्वनिर्मित काँक्रीटचे इंटरलॉकिंग क्यूब्स किंवा ब्लॉक्स वापरताना कठोर तांत्रिक निकषांचे पालन करणे आवश्यक असते. भिंत उभारताना वापरण्यात आलेले साहित्य, अंतर्गत काँक्रीट मिश्रण आणि पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था योग्य नसल्याने अशा प्रकारची ही दुर्घटना घडली असावी. पुलाच्या आतील मातीचा आणि पाण्याचा भार सहन करण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना करण्यात त्रुटी राहिल्या असाव्यात. तसेच पावसाचे किंवा झिरपणारे पाणी बाहेर जाण्यासाठी योग्य निचरा व्यवस्था नसल्याने भिंतीवर अतिरिक्त दाब निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

दोघींना किरकोळ दुखापत

भिंत कोसळण्याच्या काही क्षणांपूर्वी विद्यापीठाकडून येणाऱ्या दोन प्राध्यापिकांची दुचाकी ढिगाऱ्याखाली येण्यापासून थोडक्यात बचावली. त्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

उड्डाणपुलाचा भाग कोसळल्याची घटना अत्यंत चिंताजनक आहे. या परिसरात शासकीय रुग्णालय, विद्यापीठ आणि महाविद्यालये असल्याने विद्यार्थी, रुग्ण व नागरिकांची मोठी वर्दळ असते. अशा ठिकाणी पुलाचा भाग कोसळणे ही मोठ्या दुर्घटनेची पूर्वसूचना आहे.

-ॲड. प्रसेनजीत वाघमारे, सामाजिक कार्यकर्ता, नांदेड

Nagpur Pune Vande Bharat: प्रवाशांसाठी खुशखबर! नागपूर–पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला मिळणार नवीन १६/२० डब्यांचा रेक; विदर्भ–पश्चिम महाराष्ट्र प्रवास होणार सोयीचा

ठेकेदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून नागरिकांच्या जिवाशी खेळ केला. कोट्यवधींचा निधी खर्च होऊनही अशा प्रकारची दुर्घटना होणे गंभीर आहे. दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.-राजीव हंबर्डे, माजी सरपंच, विष्णुपुरी

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.