मोठी बातमी, काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा CM फडणवीस यांच्यासोबत प्रवास, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
Tv9 Marathi July 11, 2026 03:45 AM

राज्यात एकीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे सहा खासदार पळवून उबाठाला खिजवले आहे. दुसरीकडे शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची गट्टी जमली आहे.अशा वातावरणात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदारही शिंदे गळाला लावतात की काय अशी चर्चा असतानाच आता राजकारणात दुसरी मोठी खळबळजनक घटना घडली आहे.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज काँग्रेसचे माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्यासोबत एकत्र मुंबई ते पुणे असा प्रवास केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी मुंबईहून पुणे एकत्रित प्रवास केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या असल्या तरी त्यांनी मात्र आपण माऊलींच्या पालखीच्या दर्शनाला उपस्थित राहण्यासाठी एकत्र प्रवास केल्याचे म्हटले आहे. विश्वजीत कदम हे सांगलीच्या दिवंगत काँग्रेसचे नेते, माजी मंत्री पतंगराव कदम यांचे पूत्र असून त्यांनी महाविकास आघाडीच्या काळात मंत्री पद देखील भूषवले होते. मुख्यमंत्री आणि विश्वजीत कदम यांच्या एकत्र प्रवासाची त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

मी एकच मागणे मागतो…

अतिशय सुखाने ही वारी व्हावी हीच विठूरायाचरणी प्रार्थना आहे. मी जेव्हाही पांडुरंगाकडे जातो, तेव्हा मी एकच मागणे मागतो, की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखी ठेव. कारण सगळे शेतकरी वारकरी आहेत. मी देवाकडे येताना काही मागत नाही. न मागताही मिळतं. या वारीत येण्याची एक अनुभूती आहे. वारी ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

ते पुढे म्हणाले की सगळ्या वारकऱ्यांना आवाहन आहे की तुम्ही सगळे आनंदाने जा आणि सुखरुप जा. वारकरी हे शेतकरी पण आहेत त्यामुळे त्यांचे चांगल होवू दे. यंदा वारीसाठी ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीच्या ठिकाणी महापालिकेने जागा उपलब्ध करून दिली आहे, सगळ्यांनी सुखरूप जावे हेच आवाहन आहे. आपण काहीही अडचण न येता मी मिंसिग लिंकवरुन आलो हेच सगळ्यांना उत्तर आहे असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.