पुण्यानंतर मुंबई हादरली! कांदवलीत लोहगड घटनेची पुनरावृत्ती, डिलिव्हरी बॉयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरून ढकलले
Marathi July 11, 2026 07:25 PM

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पुण्यानंतर मुंबईत लोहगड घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. डिलिव्हरी बॉयने अल्पवयीन प्रेयसीला कड्यावरून ढकलून दिल्याची घटना कांदिवलीतील समता नगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 24 तासांच्या आत प्रकरणाचा छडा लावत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी सकाळी दामू नगरमागील एका डोंगरावर अल्पवयीन मुलीचा मृतदेह सापडल्याची माहिती समता नगर पोलिसांना मिळाली. समता नगर पोलीस, गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल होत तपास सुरू केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवला.

तपासादरम्यान, पोलिसांनी स्थानिक रहिवाशांची चौकशी करत बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासल्या. तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मृत व्यक्तीची ओळख पटवली. तपासादरम्यान मृत मुलीचे सूरज मारुती वाघमारे नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तपासात मुलीच्या हत्येत त्याचा कथित सहभाग उघड झाल्यानंतर, त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अटक केलेला आरोपी डिलिव्हरी बॉयचे काम करतो. पोलीस त्याची सखोल चौकशी करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.