सलग दोनदा टी20 वर्ल्ड कप जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी आजचा सामना आपल्या प्रतिष्ठेची लढाई बनला आहे. श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer under captaincy) नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे.
आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत 0-2 असा पराभव पत्करल्यानंतर, आता भारतीय संघ इंग्लंडविरुद्धची मालिकाही गमावून बसला आहे. मालिकेतील पहिला सामना पावसाने धुतला गेला, तर त्यानंतरच्या सलग 3 सामन्यांत इंग्लंडने भारताचा पराभव करत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता 5 व्या टी20 सामन्यात भारताकडे आपला मान राखण्याची ही अखेरची संधी आहे. केवळ सन्मानच नाही, तर आयसीसी टी20 रँकिंगमधील नंबर-1 चे स्थानही धोक्यात आहे. जर हा सामना भारत हरला, तर जागतिक क्रमवारीतील आपले पहिले स्थान भारताला गमवावे लागेल.
भारतीय संघ गेल्या 1605 दिवसांपासून टी20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे, परंतु आता हे वर्चस्व धोक्यात आले आहे. जर भारत 5 वा सामना हरला, तर इंग्लंड नवा नंबर-1 टी20 संघ बनेल. म्हणूनच, भारतासाठी हा सामना केवळ औपचारिक नसून आपली ‘बादशाहत’ टिकवून ठेवण्याची शेवटची संधी आहे. भारतीय संघ आता हा सामना जिंकून मालिका 3-1 अशी संपवण्याचा प्रयत्न करेल.
दुसरीकडे, मालिका खिशात घातल्यानंतर इंग्लंडचे लक्ष आता जगातील नंबर-1 टी20 संघ बनण्याकडे आहे .
पाचव्या सामन्यापूर्वी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक (Harry brook Captain of England Cricket team) म्हणाला, सत्य सांगायचे तर, भारताला 4-0 ने हरवून मालिका जिंकणे खूप खास असेल. जगातील नंबर-1 टीम बनणे त्याहूनही मोठी गोष्ट आहे. हेच आमचे मुख्य लक्ष्य आहे. आम्ही मैदानात उतरून त्यांना पुन्हा एकदा मोठ्या फरकाने हरवण्याचा प्रयत्न करू. आम्हाला सांगण्यात आले आहे की, हा सामना जिंकल्यास आम्ही नंबर-1 ठरू आणि आमची नजर याच कामगिरीवर आहे.
उल्लेखनीय म्हणजे, सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar yadav) जागी श्रेयस अय्यरला भारताचा टी20 कर्णधार बनवण्यात आले आहे, परंतु त्याच्या नेतृत्वाखाली भारताला अजूनही पहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. श्रेयसच्या नेतृत्वात भारताला आयर्लंडविरुद्ध ऐतिहासिक मालिका पराभवाचा सामना करावा लागला आणि आता इंग्लंडविरुद्धही सलग तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे.