नागपूरच्या उमरेड वनपरिक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून सुमारे अडीच ते तीन वर्षांच्या नरभक्षक वाघिणीने धूमाकूळ घातला होता. नागपूरमधील वाघिणीच्या हल्ल्यात 27 मार्च रोजी निर्मला गभणे यांचा मृत्यू झाला होता. तर 6 जून रोजी दिगंबर पाटील यांचा बळी गेला होते. दोघेही शेतात काम करत होते. या वाघिणीने दोन-तीन जणांना जखमी देखील केले आहे. वाघिणीच्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं.
वाघीण त्याच परिसरात असल्याचे स्पष्ट झालं. त्यानंतर वन्यप्राण्यांच्या वाहतुकीसाठी वापरला जाणारा पिंजरा आडोशाला ठेवण्यात आला. त्या पिंजऱ्यात डॉ. प्रियल चौरागडे आणि त्यांचे सहकारी प्रतीक घाटे बसले. काही वेळाने वाघीण पिंजऱ्याजवळ येऊन गेली आणि पुन्हा भक्ष्याकडे वळली.
पिंजऱ्यातून दिसणारे दृश्य मर्यादित असल्याने नेम साधणे आव्हानात्मक होते. मात्र, योग्य संधी मिळताच डॉ. चौरागडे यांनी अचूक नेम साधला.
अवघ्या १५ मिनिटांत वाघीण बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला त्याच पिंजऱ्यातून नागपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आले. सध्या वैद्यकीयदृष्ट्या वाघीण सुदृढ आहे. आता तिच्याबाबत वनविभाग निर्णय घेईल, असे सांगण्यात आलं आहे.