श्रेयस अय्यरचे पहिले रिपोर्ट कार्ड! अपयशाची लांबलचक यादी पाहून अनुभवी कर्णधारांनाही फुटेल घाम
Marathi July 12, 2026 05:25 PM

भारताच्या टी २० संघाचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या कामगिरीवर एक नजर टाकू. २०२६ चा टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघात अनेक बदल पाहायला मिळाले, त्यातील महत्त्वाचा नेतृत्व बदल. सूर्यकुमार यादवकडून कर्णधारपद काढून घेत अय्यरला नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली, तर तिलक वर्मा उपकर्णधार बनला.

अय्यरचे नेतृत्व देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आणि आयपीएलमध्ये उत्तम होते. त्यामुळे तो भारताचेही नेतृत्व तसेच चांगले करेल, अशी अपेक्षा होती. त्याचा भारताचा कर्णधार म्हणून पहिला दौरा युरोपियन खंडातील होता. यामध्ये भारताला एकूण ७ टी २० सामने खेळायचे होते.

आयर्लंडचे वर्चस्व
भारताच्या युके दौऱ्याची सुरूवात पराभवाने होईल असे कोणालाही वाटले नव्हते. या मालिकेतील पहिला सामना भारताने गमावला. त्या धक्क्यातून सावरत असताना भारताने दुसरा सामनाही गमावला आणि इतिहासात पहिल्यांदाच आयर्लंड दौऱ्यात एकही विजय न मिळवण्याची निराशाजनक कामगिरी नोंदवली.

दोन सामन्यांची ही मालिका भारताने ०-२ अशी गमावली. भारताला सर्वात सोपा वाटणारा आयर्लंड दौरा, तीन वेळेच्या विश्वविजेत्या संघासाठी सर्वात मोठा धक्का ठरला.

इंग्लंडविरुद्धही पाटी कोरीच
आयर्लंडमधील धक्कादायक कामगिरीनंतर भारतीय संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला. पहिल्या सामन्यात उत्तम फलंदाजी केली, मात्र सामना पावसामुळे अनिर्णीत राहिला. त्यानंतर इंग्लंडने जोरदार हल्ले करत सर्वच्या सर्व ४ सामने जिंकले. पाच सामन्यांच्या या मालिकेत यजमानांनी ४-० अशी बाजी मारली. त्याचबरोबर इंग्लंडने भारताचे आयसीसी क्रमवारीतील पहिले स्थानही काबीज केले.

अय्यरसाठी हे दोन्ही दौरे कर्णधार म्हणून वाईट ठरले असले, तरी त्याने इंग्लंड दौऱ्यात फलंदाजीत चांगली कामगिरी केली. २१८ धावा करत तो भारताचा या मालिकेतील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.

अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताचे लाजिरवाणे रेकॉर्ड
१. आयर्लंडविरुद्ध पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामन्यात पराभव.
२. पहिल्यांदाच आयर्लंडविरुद्धची टी २० मालिका गमावली
३. पहिल्यांदाच भारताला सलग सात टी २० सामन्यांमध्ये विजय मिळवता आला नाही.
४. टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्यांदाच १०० पेक्षा अधिक धावांनी पराभव.
५. टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात धावांच्या फरकाने सर्वात मोठ्या पराभवाची नोंद (१२५ धावा)
६. टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यात दुसरी सर्वात कमी धावसंख्या (७६/१०)
७. १२ वर्षांनंतर इंग्लंडविरुद्ध टी २० मालिका गमावली.
८. ७ वर्षांनतर, सलग दोन टी २० मालिका गमावली.
९. ब्रिस्टलमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना गमावला.
१०. पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी २० सामन्यांमध्ये २०० पेक्षा अधिक धावांची भागीदारी.
११. पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी २० सामन्यांमध्ये २५० पेक्षा अधिक धावसंख्या.
१२. टी २० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील १६०० दिवसाच्या राजवटीचा अंत.
१३. टी २० मालिकेत पहिल्यांदाच ४ सामने गमावले.
१४. पहिल्यांदाच एकही सामना न जिंकता सलग दोन टी २० मालिका गमावल्या.

अय्यरचे कर्णधाराचे १६ दिवस आणि कितीतरी डाग. चाहते २६ जून ते ११ जुलै, २०२६ काळ कधीही विसरणार नाहीत. (Shreyas Iyer Team India T20 captain Performance in Ireland and England Tour 2026)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.