Wari health services: पुणे महापालिकेकडून ५३ हजार वारकऱ्यांची आरोग्य तपासणी; पालखी मार्गावर मोफत वैद्यकीय सेवा, औषध वाटप व विशेष बूथांची सोय
esakal July 12, 2026 08:45 PM

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे गुरुवारी (ता. ९) शहरात आगमन झाले. या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात आलेल्या मोहिमेत गेल्‍या तीन दिवसांत पालख्‍यांचे प्रस्‍थान होईपर्यंत ५३ हजार ८१३ वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. वारीच्या काळात वारकऱ्यांना तत्पर आरोग्य सेवा मिळावी, यासाठी आरोग्‍य विभागाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्‍या.

पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत येणारी सर्व प्रसूतीगृहे, दवाखाने, आयुष्मान आरोग्य मंदिर आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे वारकऱ्यांसाठी मोफत केस पेपर आणि मोफत औषध वाटपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. पालखी मार्गावर आणि स्वागत कक्षांच्या ठिकाणी विशेष आरोग्य बूथ उभारण्यात आले होते, त्याद्वारे वारकऱ्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले गेले.

गुरुवार (ता. ९) ते शनिवार (ता. ११) या तीन दिवसांच्या कालावधीत झालेल्या तपासणीमध्ये वारकऱ्यांचे वजन, उंची आणि रक्तदाबाची नोंद घेण्यात आली. यासोबतच रक्त तपासणी, थुंकी तपासणी (टीबी), मलेरिया आणि साखर (शुगर) तपासणी अशा सर्वसमावेशक चाचण्या करण्यात आल्या. या मोहिमेत उपचार आवश्यक असलेल्या २१ वारकरी रुग्णांना रुग्णवाहिकेमार्फत पुढील उपचारांसाठी कमला नेहरू रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

आरोग्य सुविधेचा भाग म्हणून १ हजार २२४ वारकऱ्यांनी फिजिओथेरपी सुविधेचा लाभ घेतला. तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी २५० प्रथमोपचार मेडिकल किटचे वाटप करण्यात आले. महिला वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत प्रशासनाकडून १० हजार सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले आहे. पालखी मार्गावर एकूण ३५ ठिकाणी वैद्यकीय पथकांकडून वारकऱ्यांना आरोग्यसेवा देण्यात आली. भवानी पेठ व नाना पेठ येथील मुक्कामस्थळी २४ तास वैद्यकीय सेवा उपलब्ध होती. काही वारकऱ्यांना कमला नेहरू रुग्णालय आणि चंदूमामा सोनवणे प्रसूतिगृह येथे उपचार देण्यात आले. पुणे ते पंढरपूर या संपूर्ण प्रवासादरम्यानही महापालिकेची चार स्वतंत्र वैद्यकीय पथके व रुग्णवाहिका वारकऱ्यांसोबत राहणार आहेत. त्यात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी आणि दोन रुग्णवाहिकांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.