पराग जगताप,
ओतूर : जुन्नर तालुक्यातील नगर-कल्याण महामार्गावरील कोळवाडी येथे रविवारी सकाळी ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे गाडी चोरीच्या संशयित गुन्हेगारांच्या टोळीतील दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले, तर हत्यारांचा धाक दाखवत इतर तीन जण पसार झाले आहे.पैकी एकाला दुपारी साडेतीन वाजता पोलिसांनी व ग्रामस्थांनी आलमे गावच्या परीसरात पकडले आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.
याबाबत स्थानिक नागरिकांनी व पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनुसिंग पापसिंग दुधानी (वय ३५, रा. हडपसर, पुणे) आणि जिलूसिंग शेरसिंग दुधानी (वय ३८, रा. खोपोली, जि. रायगड) या दोघांना ग्रामस्थांनी पकडून ओतूर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. संशयितांकडे असलेले एमएच-१७ एजे-३०७५ क्रमांकाचे बोलेरो वाहन हे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील कोल्हार येथून चोरीला गेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी कोळवाडी येथील विघ्नेश घोलप यांना त्यांचे कोल्हार ता.राहुरी येथील नातेवाईक यांचा फोन आला की आपली बुलेरो गाडी चोरीला गेली आहे.विघ्नेश घोलप हे कामावर जात असताना त्यांना कोळवाडी येथील वडापावच्या हॉटेल समोर उभे असलेले बोलेरो वाहन ओळखीच्या नातेवाईकांचे असल्याचे लक्षात आले.तसेच हॉटेलमध्ये सहा जण वडापाव खात असताना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.घोलप यांनी गाडी बाबत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची व अरेरावीची उत्तरे देत प्रतिकार केला. संशय अधिक बळावल्याने घोलप यांनी वाहनाची चावी काढून घेतली. यामुळे वाद चिघळला आणि संशयितांनी (चाकू) हत्यारे बाहेर काढत धमकावण्यास सुरुवात केली.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले. ग्रामस्थांनी धाडस दाखवत एका संशयिताला घटनास्थळीच पकडले, तर दुसऱ्याला शेजारील शेतात पाठलाग करून ताब्यात घेतले. मात्र उर्वरित तीन जणांनी गावठी कट्टे व इतर हत्यारांचा धाक दाखवत ग्रामस्थांना चकवा देऊन पिंपळगाव जोगा गावाकडे व पुष्पावती नदी परिसराच्या दिशेने पलायन केले.
दरम्यान,संशयितांना पकडताना ग्रामस्थांवर त्यांनी दगडाने हल्ला केला यावेळी प्रतिकार करताना संतप्त ग्रामस्थांनी पकडलेल्या दोघांना चांगलाच चोप दिला. घटनेची खबर मिळताच ओतूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे प्राथमिक चौकशी केली असता ताब्यातील दोन्ही संशयितांवर राज्यातील विविध पोलीस ठाण्यांत गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच त्यांच्या बोलेरो वाहनातून विविध प्रकारची हत्यारे व चोरीसाठी वापरत असलेले साहित्य मिळाले आहे . फरार झालेल्या चौघांची ओळख अद्याप पटलेली नसून त्यांचा शोध घेण्यासाठी ओतूर पोलिस व स्थानिक नागरिक तरुण परीसरात पहाणी करत आहेत.यात यश येत तीसरा संशयीत साडेतीन वाजे दरम्यान पकडला असून इतरांचा शोध सुरु आहे.
या धाडसी कारवाईमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना व्यक्त होत असून, प्रसंगावधान राखून संशयितांना पकडणाऱ्या कोळवाडीच्या ग्रामस्थांचे सर्वत्र कौतुक होत आहे. पुढील तपास ओतूरचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक युवराज जाधव व पोलिस कर्मचारी पथक करत आहेत.