'अल्टिमेट टेबल टेनिस' (UTT) सीझन ७ मधील रविवारी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर झालेल्या सामन्यात, फ्रेंच ऑलिंपियन आणि स्पर्धेत पदार्पण करणाऱ्या पृथिका पावाडे हिने दमदार कामगिरी केली. तिच्या या कामगिरीच्या जोरावर पीबीजी पुणे जॅग्वार्सने यूपी प्रोमिथियन्सचा ९-६ असा पराभव करत स्पर्धेतील आपला पहिला विजय नोंदवला.
महिला एकेरीच्या निर्णायक सामन्यात, पृथिकाने 'बटरफ्लाय UTT' मध्ये दोनदा सर्वात मौल्यवान खेळाडू ठरलेल्या यांगझी लियूचा पराभव करून आपल्या या कामगिरीला अविस्मरणीय वळण दिले. सुरुवातीला एक गेम गमावल्यानंतर तिने जबरदस्त पुनरागमन केले आणि निर्णायक गेममध्ये उत्कृष्ट खेळ करत या हंगामातील आतापर्यंतच्या सर्वात प्रभावी विजयांपैकी एक विजय साकारला.
जर्मनीच्या रिकार्डो वाल्थरने प्रभावी कामगिरी करत इजिप्तच्या ओमर अस्सारचा तीन गेम्समध्ये पराभव करून 'यूपी' संघाला दमदार सुरुवात करून दिली. पुण्याने याला त्वरित प्रत्युत्तर दिले; दिया चितळेने एक गेम गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन करत सायली वाणीचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. त्यानंतर स्नेहित एसएफआर आणि पावाडे यांनी संयम राखत मिश्र दुहेरीतील नाट्यमय 'गोल्डन पॉइंट्स' जिंकून 'जॅग्वार्स'चे वर्चस्व प्रस्थापित केले.
स्नेहितने आणखी एका तीन-गेमच्या लढतीत सुधांशू ग्रोव्हरवर मात करत या हंगामातील आपली अपराजित कामगिरी कायम राखली आणि अंतिम सामन्यापूर्वी पुणे संघाला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. लढत अजूनही चुरशीची असताना, पावडेने दुपारच्या सत्रातील सर्वोत्तम कामगिरी सादर केली; लिऊविरुद्ध पहिला गेम गमावल्यानंतर तिने जोरदार पुनरागमन करत सामन्यावर नियंत्रण मिळवले आणि लीगच्या सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एकावर अविस्मरणीय विजय नोंदवला, ज्यामुळे पुणे संघाचा या पर्वातील पहिला विजय निश्चित झाला.
अंतिम निकालपीबीजी पुणे जॅग्वार्स ९-६ यूपी प्रोमिथियन्स
ओमर अस्सार पराभूत वि. रिकार्डो वाल्थर १-२ (४-११, १०-११, ११-९)
दिया चितळे विजयी वि. सायली वाणी २-१ (९-११, ११-८, ११-१०)
स्नेहित एसएफआर/पृथिका पावडे वि. वि. रिकार्डो वाल्थर/स्वस्तिका घोष २-१ (८-११, ११-१०, ११-१०)
स्नेहित एसएफआर वि. वि. सुधांशू ग्रोव्हर २-१ (११-७, ३-११, ११-९)
पृथिका पावडे वि. वि. यांग्झी लियू २-१ (४-११, ११-७, ११-९)